पालघर : मिरा- भाईंदर, वसई – विरार व भिवंडी- निजामपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील १०८६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यामध्ये अधिक तर शासकीय व अनुदान शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. निवडणुक कर्मचाऱ्यांच्या आज आयोजित प्रशिक्षणात गोंधळाचे वातावरण झाल्याचे चित्र दिसून आले असून कर्मचाऱ्यांना आपल्या भागातून शहरात पोहोचताना व परतताना अतोनात हाल झाले. विशेष म्हणजे अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, पर्यावेक्षक यांच्यासह मोजके शिक्षक कामावर असल्याने शाळांना आज अघोषित सुट्टी साजरी झाली.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज वसई व भाईंदर येथे आयोजित करण्यात आले होते. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिक्षकांना या दोन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रथम पश्चिम रेल्वेचे जवळचे रेल्वे स्टेशन गाठणे व त्यानंतर वसई अथवा भाईंदर पर्यंत प्रवास करण्याचा एकाच वेळी प्रसंग आला. विरार ते डहाणू रोड दरम्यान उपनगरीय गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने प्रशिक्षणाला जाण्याच्या तसेच परतण्याच्या वेळेत उपनगरीय गाड्यांमध्ये तुफान गर्दी झाली. इतर वेळी रेल्वे प्रवासाची सवय नसणाऱ्या शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना उपनगरीय सेवेतील चेंगराचेंगरीचा त्रास झाला.

प्रशिक्षणाच्या ठिकाणी शिक्षकांना नोंदणी करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे तसेच नोंदणी कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तन झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या असून अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर प्रशिक्षणात प्रत्यक्षात सहभागी न होता घरचा रस्ता पकडल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या बोलण्याला सामोरे जावे लागले.

महानगरपालिका क्षेत्रातील या निवडणूक कार्यक्रमात शासकीय व अनुदानित शाळेतील बहुतांश शिक्षकांना निवडणूक कर्मचारी म्हणून सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाच्या वेळी शाळांमधील शिक्षकांची संख्या मोजकी राहिल्याने विद्यार्थ्यांना आज भरलेल्या शाळेमध्ये सुट्टीचा अनुभव आला. विशेष म्हणजे अपंग शिक्षकांना निवडणूक ड्युटी मधून सूट देण्याची पद्धती शासनाकडून अवलंबली जाते. आता याप्रसंगी अपंग कर्मचाऱ्यांना देखील निवडणुकीचे काम सोपवल्याची माहिती काही शिक्षकाने लोकसत्ताला दिली.

मीरा भाईंदर येथील निवडणूक कर्मचाऱ्यांना वसई येथील प्रशिक्षण केंद्रात बोलवले गेल्याने अशा अनेक शिक्षकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर शिक्षकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला समर्पित उत्तर मिळाले नसल्याचे तसेच कारवाई करण्याबाबत दमदाटी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षकांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी केले आहेत. या प्रकरणात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी आगामी काळात आवश्यक दक्षता घ्यावी व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तालुका निहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक

महापालिका पार्श्वभूमीवर निवडणूक व्यवस्थापनाला वेग आला असून, विविध तालुक्यातील कर्मचारी वृंदाची सविस्तर माहिती मिरा–भाईंदर, वसई–विरार व भिवंडी महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. तालुकानिहाय कर्मचाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

दरम्यान, वसई–विरार शहर महानगरपालिकेकडून वरीलप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या तालुक्यांखेरीज इतर तालुक्यांतील कर्मचाऱ्यांबाबत यापूर्वी कोणतेही आदेश काढले असतील, तर ते तत्काळ रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे दुबार आदेश, किंवा प्रशासकीय अडचणी टाळता येणार असून निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

एकूणच १०,८६५ कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे मिरा–भाईंदर, वसई–विरार व भिवंडी–निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, आणि काटेकोरपणे पार पाडण्यासाठी मदत मिळणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

मिरा–भाईंदर महानगरपालिकासाठी निवडणूक कामकाजासाठी

  • डहाणू : १,८७२ कर्मचारी
  • विक्रमगड : १,११५ कर्मचारी

असे एकूण २,८९७ कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वसई–विरार शहर महानगरपालिकासाठी सर्वाधिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले असून,

  • पालघर : २,७१२
  • वसई : १,२७३
  • तलासरी : १,०२३
  • जव्हार : १,१३१
  • मोखाडा : ६७२

असे एकूण ६,८११ कर्मचारी तपशील महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

भिवंडी–निजामपूर शहर महानगरपालिकासाठी वाडा तालुक्यासाठी १,१५७ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.