पालघर : पालघर येथील नवली उड्डाणपुलावर काल रात्री ८ एप्रिल रोजी एक भीषण अपघाताची घटना घडली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे.
नवली परिसरात राहणाऱ्या पुनम जितेंद्र सांगळे (३६) या बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नवली उड्डाणपुलावर शतपावली (चालणे) करत होत्या. दरम्यान, पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पुनम सांगळे यांचे डोके उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळले. या धडकेनंतर दुचाकीस्वारही रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी पुनम सांगळे यांना मृत घोषित केले. जखमी दुचाकीस्वारावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या पुलावर अनेक समस्या आहेत. उड्डाणपुलावर अद्याप पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे प्रचंड अंधार असतो. पुलाची रचना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे बोलले जात असून, यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही.
पुलावर सकाळी आणि रात्री मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात, मात्र वाहनांच्या वाढत्या वेगामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यानेच अशा जीवघेण्या घटना घडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. “पुलावर त्वरित दिवे लावावेत आणि वेगमर्यादेचे नियम कडक करावेत,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
