पालघर : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने आज पालघर येथे एका नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले. विश्वासार्ह डिजिटल ओळख सेवा प्रदान करणे आणि ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला बळकट करणे या प्राधिकरणाच्या उद्दिष्टाला याद्वारे अधिक गती मिळणार आहे. अशा प्रकारचे राज्यातील ११ वे केंद्र असून एकाच ठिकाणी चार आधार संच आणि पारपत्र कार्यालयाच्या धर्तीवर कामकाज प्रणाली असून आधार संदर्भात तक्रार निवारण करण्याची व्यवस्था जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.
पालघर जिल्ह्यात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या UIDAI आधार सेवा केंद्राचे (Aadhaar Seva Kendra – ASK) उद्घाटन आज पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, नगराध्यक्ष उत्तम घरत, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी झाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, UIDAI क्षेत्रीय कार्यालयाचे (मुंबई) संचालक कर्नल अक्षय यादव तसेच इतर लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात एकूण २३८ आधार केंद्र. कार्यरत असून महिन्याला अंदाजे ४० हजार आधार नोंदणी तथा अद्यावतीकरण करण्यात येत आहे. पालघर रेल्वे स्थाकाजवळ कार्यरत झालेल्या या आधार सेवा केंद्र आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार आहे. या केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक (लोकसंख्याशास्त्रीय) तपशिलांमध्ये सुधारणा आणि जागेवरच तक्रार निवारण यांसारख्या सेवा उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा, व्हीलचेअरची सोय, सुलभ प्रसाधने आणि सुरळीत सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी एका समर्पित ‘आधार सेवा केंद्र व्यवस्थापकाची’ नियुक्ती करण्यात आली आहे.
समान सेवा मानके, मजबूत डेटा सुरक्षा आणि वेळेवर तक्रार निवारण सुनिश्चित करण्यासाठी सर्व आधार सेवा केंद्रे युआयडीएआयद्वारे त्यांच्या भागीदार संस्थेच्या माध्यमातून थेट चालवली जात असून प्रत्येक नागरिकाला एक विश्वासार्ह डिजिटल ओळख प्रदान करण्याची आपली बांधिलकी युआयडीएआय याद्वारे अधोरेखित केले आहे. या केंद्रामार्फत पुढील पिढीची डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी शाळांमध्ये विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री यांनी आधार सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यातील या आधुनिक आधार सेवा केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आधार नोंदणी, आधारमधील माहिती अद्ययावत करणे, बायोमेट्रिक अपडेट, मोबाईल क्रमांक व ई-मेल अद्ययावत करणे, पत्ता, नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी माहितीतील दुरुस्ती अशा विविध सेवा एकाच ठिकाणी दर्जेदार पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट Mandatory Biometric Update (MBU) या उपक्रमावर भर देत सांगितले की, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलामुलींनी तसेच ज्या नागरिकांनी दीर्घकाळ बायोमेट्रिक अद्ययावत केलेले नाही अशा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे असे आवाहन केले. अद्ययावत बायोमेट्रिक माहितीमुळे आधार प्रमाणीकरण अधिक अचूक होईल व शासकीय योजनांचा लाभ, शिष्यवृत्ती, शैक्षणिक प्रवेश, बँकिंग सेवा, सामाजिक सुरक्षा योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्था, विविध अनुदान योजना तसेच इतर डिजिटल सेवांचा लाभ नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी UIDAI आधार सेवा केंद्राचा लाभ घ्यावा, पात्र मुलांचे तसेच आवश्यक असलेल्या सर्व नागरिकांचे Mandatory Biometric Update (MBU) वेळेत पूर्ण करून घ्यावे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
डिजिटल साधनांचा वापर
नागरिक युआयडीएआयच्या अपॉइंटमेंट पोर्टलवर (https://bookappointment.uidai.gov.in) जाऊन आधीच आपली वेळ (अपॉइंटमेंट) आरक्षित करू शकतात. तसेच, या आधार केंद्राचे भौगोलिक स्थान भुवन आधार पोर्टलवर (https://bhuvan-app3.nrsc.gov.in/aadhaar) उपलब्ध आहे.
“पालघरमधील हे आधुनिक आधार सेवा केंद्र येथील नागरिकांना अधिक जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल. ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.” – गणेश नाईक, पालकमंत्री
UIDAI आधार सेवा केंद्राचे प्रमुख लाभ
- नागरिकांना सर्व आधार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध.
- आधुनिक संगणकीय सुविधा व प्रशिक्षित ऑपरेटरमार्फत जलद व गुणवत्तापूर्ण सेवा.
- आधार नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी पारदर्शक आणि प्रमाणित प्रक्रिया.
- बायोमेट्रिक अद्ययावत करून आधार प्रमाणीकरणाची अचूकता वाढविणे.
- शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत आधार माहिती उपलब्ध राहणे.
- ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर सेवा.
