पालघर : सातपाटी येथे १३६० मीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला असला तरी समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे तसेच दगडाच्या वजनाने बंधारा खचल्याने पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाचे पाणी गावात शिरण्याचे प्रकार पुन्हा घडू लागले आहेत. त्यामुळे अस्तित्वात असणाऱ्या बंधाराची उंची वाढवणे तसेच अशा बंधार्यांच्या पायथ्याशी टेट्रापॉड बसवण्याची मागणी पुढे येत आहे.
पालघरचे माजी खासदार राम नाईक यांच्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याच्या कारकिर्दी दरम्यान सातपाटी येथे प्रथम धूप प्रतिबंधक बंधारा इंडियन ऑइल कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीमधून उभारण्यात आला होता. काही वर्षांनी या बंधाऱ्याची धूप झाल्यानंतर तसेच बंधाऱ्याला भगदाड पडल्याने गावात वेगवेगळ्या वसाहतींमध्ये समुद्राच्या लाटाद्वारे पाण्याचा शिरकाव होऊन घरांचे नुकसान होऊ लागले होते.
राज्य शासनाने सन २०१९ पासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नव्याने धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्याचे काम हाती घेतले. सरकारच्या पतन विभागाने ४२५ मीटर नंतर ९५ मीटर व पाठोपाठ ४७५ मीटर, २०५ मीटर व १६१ मीटर असा एकंदर १३६० मीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा उभारला होता. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर अर्थात केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र यांच्या अभ्यासानुसार बंधार्यांची उंची आठ मीटर इतकी निश्चित करण्यात आली होती. या बंधाऱ्याचे काम सन २०२२-२३ दरम्यान पूर्ण करण्यात आले होते.
त्यानंतर वर्षभर पावसाळ्यात उधाणा दरम्यान येणाऱ्या मोठ्या उंचीच्या लाटांचे पाणी रोखण्यास काही प्रमाणात यश आले होते. लाटांच्या तीव्रतेमुळे धूप प्रतिबंधक बंधार्यामध्ये असणाऱ्या दगडांची झीज होणे, दगड फुटणे यामुळे बंधाऱ्याला काही ठिकाणी भगदाड पडल्याचे दिसून आले आहे. दगडांच्या वजनामुळे या बंधाऱ्याची प्रभावी उंची कमी झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या उधाणादरम्यान सातपाटीच्या दांडा परिसरातून बस स्टॉप पर्यंतच्या भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
दांडा खाडी परिसरात धूप प्रतिबंध बंधाऱ्याचे दगड समुद्रकिनारी विखरून गेल्याचे दिसून आल्याने ग्रामपंचायतीने उत्खनकाच्या साहाय्याने ते रचून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र समुद्री लाटांच्या तीव्रतेसमोर ते निष्क्रभ ठरल्याचे दिसून आले. अस्तित्वात असणाऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी आमदार राजेंद्र गावित यांनी आमदार निधीमधून निधी देण्याचे आश्वासित केले असून जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीमधून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील दर्शवली आहे. मात्र यंदाच्या मान्सून मध्ये पावसाने सुरुवात पासून दमदार आगमन केल्याने या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे शक्य न झाल्याने गावकऱ्यांना पुन्हा घरांमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहे.
पतन विभागाने बंधार्याची उंची आठ मीटर वरून नऊ मीटर वाढवण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करायला घेतले असून महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या सातपाटी मच्छीमारी जेट्टी सुमारे एक किलोमीटर भाग व्यापला जात असल्याने उर्वरित भागात अस्तित्वात असलेल्या धूप प्रतिबंधक बंधार्याची उंची वाढवण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले जात असल्याची माहिती सहाय्यक पतन अभियंता कल्पेश सावंत यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन लेखाशीर्षका अंतर्गत सातपाटी येथील बंधाऱ्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या निधीमधून ३०० ते ३५० मीटरचा बंधारा उभारला जाण्याची शक्यता आहे. या कामाला प्रत्यक्ष उभारणी सुरू होण्यास काही महिन्यांचा अवधी लागणार असून त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सातपाटी वासियांच्या समस्या कायम राहणार आहेत.
टेट्रापोडची मागणी सातपाटी येथे धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले असले तरीही वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे असा बंधारा पाच सात वर्षापेक्षा अधिक काळ टिकत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर टेट्रापोडचा पाया असणाऱ्या बंधाऱ्यांची उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.