पालघर : पालघर गणेश नगर परिसरातील औद्योगिक वसाहती मधील ‘परफेक्ट कंटेनर’ या कंपनीला आज दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीच्या स्क्रॅप याड मध्ये सोलारचे काम सुरू होते. या कामादरम्यान वेल्डिंग करताना ठिणगी प्लास्टिक ट्यूब वर पडून आग लागण्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘परफेक्ट कंटेनर’ कंपनीच्या स्क्रॅप यार्डमध्ये प्रथम आग लागली. ही कंपनी औषधनिर्माण आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी लागणाऱ्या ॲल्युमिनियम आणि लॅमिनेटेड ट्यूब्सचे उत्पादन करते. कोटिंग आणि प्रिंटिंगसाठी वापरले जाणारे ‘गम’ आणि ‘थिनर’ साठा यामुळे आगीचा भडका उडाला. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की संपूर्ण विभाग जाळून गेला. गम आणि थिनर सारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आकाशात पसरलेले काळ्या धुराचे लोट लांबवर दिसत होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत, पालघर नगरपरिषद व इतर एक अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, पोलीस प्रशासनही घटनास्थळी तैनात आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

नागरिकांचा प्रक्षोभ आणि सुरक्षेचा प्रश्न

दोन आठवड्यांपूर्वीच पालघरमधील ‘डुरियन’ या फर्निचर कंपनीला भीषण आग लागली होती. त्यानंतर आता पुन्हा ‘परफेक्ट कंटेनर’ मध्ये लागलेल्या आगीमुळे औद्योगिक वसाहतींमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार आग लागूनही कंपनीने सुरक्षेचे कडक नियम पाळले का? प्रशासनाने यापूर्वी झालेल्या आगींनंतर काय कारवाई केली? असे प्रश्न विचारत नागरिकांचा प्रक्षोभ उफाळून आला आहे. निवासी भागाजवळ असलेल्या या कंपन्यांच्या ‘फायर ऑडिट’वर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.