पालघर : होळी आणि धुळवडीच्या उत्साहात मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर पालघर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. २ मार्च ते ४ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विविध भागांत करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण ६३२ केसेस दाखल केल्या असून, ४ लाख ८२ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनेक बांधवांनी तीन आणि चार मार्च अशा दोन्ही दिवशी धुळवड साजरी केल्यामुळे पोलिसांनी तीन दिवस सलग ही मोहीम सुरू ठेवली होती.
रस्ते अपघात रोखणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. पालघर जिल्ह्यातील मुख्य चौक, पर्यटन स्थळांचे परिसर, पोलीस चौक्या आणि प्रमुख महामार्गांवर ३ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस अंमलदारांचा फौजफाटा या कामी तैनात करण्यात आला होता.
नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे कसून तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी नियमांचे किरकोळ उल्लंघन आढळले, तिथे पोलिसांनी चालकांना समज देऊन सोडून दिले, मात्र गंभीर स्वरूपाच्या नियमाभंगावर कडक कारवाई करण्यात आली.
या तीन दिवसांच्या कारवाईत ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत १०४ तळीरामांवर गुन्हे दाखल करून त्यांची प्रकरणे न्यायालयाकडे सोपवण्यात आली आहेत. याशिवाय हेल्मेट न वापरणाऱ्या ४१३ दुचाकीस्वारांकडून ८९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सीट बेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्या ३७ जणांकडून ३७ हजार रुपये, तर क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ५५ वाहन चालकांकडून ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या ११ जणांवर कारवाई करत १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ वाहनांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली असून ही सर्व प्रकरणे आता न्यायालयात चालवली जाणार आहेत.
होळीच्या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत. सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
