महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२४-२५ अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. पोलीस शिपाई पदाच्या १५८ आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या ७ अशा एकूण १६५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील एकूण ९,१०९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
ही भरती प्रक्रिया मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा म्हणजेच मैदानी चाचणी ११ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पोलीस परेड ग्राउंड, कोळगाव (पोलीस मुख्यालय) येथे पार पडणार आहे. यासाठी ७,७६३ पुरुष आणि १,४४६ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
मदत कक्ष आणि निवासाची व्यवस्था
बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्थानक आणि बस स्थानक येथे ‘पोलीस भरती हेल्प डेस्क’ (मदत कक्ष) उभारण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांच्या राहण्यासाठी प्रशासनाने निवासाची व्यवस्था केली आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी अंबामाता मंदिर, हुतात्मा चौक, पालघर तर पुरुष उमेदवारांसाठी उमरोळी ग्रामपंचायत हॉल आणि पद्मनाभ स्वामी मंदिर, टेंभोडे येथे करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी कडक नियमावली
पारदर्शक भरतीसाठी पोलीस दलाने काही कडक नियम लागू केले आहेत. मैदानी चाचणीवेळी डिजिटल स्मार्ट वॉच किंवा इतर कोणत्याही तांत्रिक साहित्याचा वापर करण्यास मनाई आहे. धावण्याच्या चाचणीसाठी ‘स्पाईक शुज’ वापरता येणार नाहीत. डमी उमेदवार बसवणे किंवा उत्तेजक द्रव्यांचे सेवन करणे यांसारखे गैरप्रकार आढळल्यास उमेदवारावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आमिषांना बळी पडू नका, तक्रारीसाठी हेल्पलाईन जारी
पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे निपक्षपातीपणे पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. “कोणीही व्यक्ती ओळख काढून किंवा आमिष दाखवून पैशांची मागणी करत असल्यास, त्यास बळी पडू नका. अशा कोणत्याही आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष (०२५२५-२०५३००) किंवा पोलीस हेल्पलाईन (८६६९६०४००४) या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन पालघर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ०२५२५-२९७२९७ या क्रमांकावरही तक्रार नोंदवता येईल.

