पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात २४ जून रोजी मध्यरात्री एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून केलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणगाव येथे २४ जून रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास तुकाराम शिवराम पाटील (८७) यांच्या घरात काही अज्ञात इसमांनी प्रवेश केला. दरोडेखोरांनी घराच्या मागील पडवीची कडी-कोयंडा तसेच हॉलचा मुख्य दरवाजा लोखंडी गजाने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तुकाराम पाटील आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. घरातील सर्व कपाटे आणि पलंग उचकटून त्यांनी मौल्यवान वस्तू आणि पैशांची शोधाशोध करून दरोडा टाकला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडा, पडघा आणि भिवंडी परिसरात सखोल तपास करण्यात आला.
या तपासामध्ये पोलिसांनी वैभव दिलीप संगारे (३४, रा. भिवंडी), विनोद नामदेव पाटील (३१, भिवंडी), भूषण दीपक धुमाळ (३७, कल्याण), सनी साईनाथ पष्टे (२१, भिवंडी), प्रतीक अरुण पष्टे (२३, भिवंडी), महेश रमेश जाधव (२०, वाडा) या सहा संशयित आरोपींना 3 जुलै रोजी अटक केली. या सर्व आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींना वाडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार तसेच त्यांचे सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेढे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, पोलीस हवालदार भगवान आव्हाड, पोलीस हवालदार संदीप सरदार, पोलीस हवालदार राकेश पाटील, पोलीस हवालदार कैलास पाटील, पोलीस हवालदार दिनेश गायकवाड, पोलीस अंमलदार नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार विशाल कहय, पोलीस अंमलदार महेश अवतार तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली गुंड, पोलीस अंमलदार रोहित तोरस्कर आणि महिला पोलीस अंमलदार स्नेहल शेलार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी वैभव दिलीप संगारे आणि भूषण दीपक धुमाळ यांच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वैभव संगारेविरुद्ध पडघा पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये आणि भूषण धुमाळविरुद्ध कल्याण आणि पालघर पोलीस ठाण्यात २०१४ व २०२१ मध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.