पालघर : प्रजासत्ताक दिनी केळवा समुद्र किनाऱ्यवर एका मुलीच्या अंगावरून घोडा गाडी गेल्याच्या प्रकारात संबंधित घोडागाडी मालकाविरुद्ध केळवे सागरी पोलिसांनी हलगर्जीपणा तसेच गंभीर दुखापत पोचविल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी समुद्रकिनारी असणारे घोडागाडी, उंट सफर, बीच बाईक यांना चालविण्यासाठी आवश्यक परवाने नसल्याने हे उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत.

पालघर शहरात राहणाऱ्या जान्हवी पाटील (१२) यांच्यासह त्यांच्या इमारती मधील महिला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केळवे किनाऱ्यावर येथे २६ जानेवारी रोजी गेल्या होत्या. दुपारी साडेचार वाजल्याच्या सुमारास पर्यटकांना घोडागाडी सफर करणारा एक टांगा भरधव तिच्या दिशेने आला. बेसावध असल्याने जान्हवी हिला टांग्याने धडक घेऊन टांग्याची चाक तिच्या पोटावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली. ही मुलीवर वर सध्या मुंबई (अंधेरी) येथील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान केळवे पोलिसांनी जखमी मुलीच्या नातेवाईकांशी तसेच सोबत असणाऱ्या महिला सहकाऱ्यांशी संपर्क करून संबंधित घोडागाडी मालका विरुद्ध काळ (ता २८) हलगर्जीपणा, घोडागाडी बेदरकारपणे चालवणे तसेच तरुणीला गंभीर जखमी करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येत असून आरोप पत्र दाखल करण्याच्या दृष्टीने इतर पुरावे व तपास केला जात असल्याची महिती देण्यात आली. दरम्यान किनाऱ्या वर पर्यटकांच्या करमणुकीसाठी परवाने दिले गेल्यास त्यावर देखरेख ठेवणासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ, राज्य सरकारचा पर्यटन विभाग तसेच ग्रामपंचायतीकडून नियमन व देखरेख ठेवण्याची यंत्रणा नसल्याचे दिसून आले आहे. असे अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी ठोस नियमावली तयार करून त्याच्या पालनासाठी यंत्रणा कार्यरत करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

बीच बाईक, घोडा गाड्या बंद…

महाराष्ट्र सागरी मंडळाने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाला वाव मिळावा या उद्देशाने बीच बाईक, सागरी नौकानयन, घोडा गाड्या, उंट सफर सारख्या प्रकारांना परवानगी दिली होती. मात्र संबंधितांनी महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच राज्याच्या पर्यटन विभागा तर्फे देण्यात आलेले परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याने पर्यटकांसाठी करमणकीची ही साधने बंद ठेवण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यवर मोठ्या प्रमाणात पर्यटक असताना बेदरकारपणे व अति जलद वेगाने बाईक व टांगे पर्यटकांसाठी चालवत असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. तर पर्यटकांचा ओघ किनाऱ्याच्या उत्तरेच्या बाजूला असताना बाईक, घोडा गाडी व इतर मनोरंजनाचे प्रकार दक्षिणेच्या दिशेने चालवण्याच्या सूचनेकडे संबंधित दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले आहेत. या संदर्भात केळवे सागरी पोलीस स्टेशन ने यापूर्वी देखील नोटीस बजावली होती. या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकांना आवश्यक कागदपत्र सादर न केल्याने बीच बाईक, घोडा गाडी, उंट सफर यांना तातडीने बंद करण्यात आली आहे.

पुन्हा पर्यटकांना घेण्यासाठी जलद वेग

सध्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर आठ ते दहा घोडा गाड्या असून तितक्याच प्रमाणात बीच बाईक कार्यरत आहेत. आपल्याला मिळालेल्या पर्यटकांना लवकरात लवकर मूळ स्थळी आणून पुन्हा नवीन पर्यटकांना सफर घडवून आणण्यासाठी परस्परात स्पर्धा सुरू असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या मुळे अति जलद पद्धतीने वाहने व घोडा गाड्या हाकल्या जात असल्याने समुद्रकिनारी असणाऱ्या इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. घोडे व उंट यांची विस्टा समुद्रावर पडून राहत असल्याने इतर पर्यटकांना देखील आरोग्याची समस्या निर्माण होत असल्याचे काही पर्यटकांनी लक्ष वेधले आहे.

पंधरा वर्षांपूर्वी असाच प्रकार

सुमारे १५-१६ वर्षांपूर्वी समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या मुंबईच्या एका कुटुंबा मधील एका सदस्याच्या अंगावरून घोडा गाडी गेल्याने कमरेचे हाड फ्रॅक्चर झाल्याने त्या तरुणाला आयुष्यभर अपंगत्व आले आहे. त्याप्रसंगी स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने मुंबई येथून तक्रार नोंदवल्याची माहिती काही जाणकाराने दिली आहे. या प्रकारात्मक केळवे पोलीस तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेत कार्यरत असून गंभीर जखमी जान्हवी पाटील कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे.