पालघर : जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावर मागील आठवड्यात झालेल्या धडक कारवाईची चर्चा ताजी असतानाच, आता पालघर येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील विनापरवाना आणि अस्वच्छ कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या या कॅन्टीनचा अन्न व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील कॅन्टीनची अचानक तपासणी केली. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संबंधित कॅन्टीनकडे अन्न व्यवसाय चालविण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला वैध परवाना किंवा नोंदणीच उपलब्ध नव्हती. यासह कॅन्टीनमधील स्वयंपाकघराची स्वच्छता आणि एकूणच आरोग्यविषयक परिस्थिती अतिशय असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले.
अन्न तयार करण्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या निकषांचे उल्लंघन करणे आणि वैध परवाना नसणे ही गंभीर बाब आहे. ही सर्व कृत्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी हा बडगा उचलण्यात आला असून, जोपर्यंत कायदेशीर परवाना आणि स्वच्छताविषयक सर्व त्रुटींची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत हे कॅन्टीन पुन्हा सुरू करता येणार नाही, असे अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इतर व्यवसायिकांसाठी इशारा
जिल्हाधिकारी कार्यालयानंतर थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅन्टीनवर झालेली ही कारवाई पालघरमधील अन्न व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडवून देणारी ठरली आहे. एफडीए प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांना सक्त ताकीद दिली आहे की, सर्वांनी आपले वैध FSSAI परवाने किंवा नोंदणी करून घ्यावी आणि अन्न सुरक्षा, स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा विभागाने दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनला देखील काळजी घेण्याच्या सूचना
अन्न व औषध प्रशासनाकडून प्रशासकीय कार्यालयातील उपहारगृहांकडे विशेष लक्ष दिले जात असून काल गुरुवारी झालेल्या कारवाई दरम्यान जिल्हा परिषद येथील उपहारगृहाकडे देखील तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे वैद्य परवाना असल्याने व पुरेशी स्वच्छता असल्याने इतर काही बाबी सुधारण्यासाठी सूचना दिल्याचे अन्न व औषध विभागाकडून सांगण्यात आले आहे
अन्न सुरक्षा व नागरिकांचे आरोग्य याबाबत शासनाकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विनापरवाना अन्न व्यवसाय तसेच स्वच्छता व अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील.- प्रवीण सूर्यवंशी, सहायक आयुक्त (अन्न), पालघर परिमंडळ–1
