पालघर: पालघर शहरातील मुख्य वाहतुकीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस चौकीशेजारी रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका ७५ वर्षीय वृद्धाचा दुचाकीवरून तोल जाऊन अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नव्याने तयार केलेल्या फ्री लेफ्टवर काँक्रीट आणि डांबरी रस्ता समांतर न केल्याने हा अपघात घडला. शहरातील खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही पालघर नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे रुंदीकरण काम हाती घेण्यात आले असून बोईसरकडून मनोरकडे आणि मनोरकडून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या चौकातील कोपरे रुंद करून फ्री लेफ्ट तयार करण्यात आला आहे. मात्र, या रुंदीकरणादरम्यान पोलीस चौकीशेजारील काँक्रीट आणि डांबरी रस्ता समांतर करण्यात आला नाही. त्यामुळे येथे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक वाहनचालकांचे तोल गेले आहेत. आज, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास टेंभोडे येथील रहिवासी ब्रिजमोहन भोलाराम निर्मल (७५) हे मनोरकडून पालघरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात त्यांचा तोल गेला. त्याच वेळी मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी
नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालघर नगर परिषद विकास कामांच्या नावाने नवनवीन रस्त्यांची कामे हाती घेत असताना सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे जात नाहीत. पावसाळ्यापूर्वीपासून असलेले खड्डे पावसाळ्या दरम्यान अधिक वाढल्याने काही वेळा त्यामध्ये तात्पुरती खडी टाकून वेळ मारून नेली असली तरीही दुसऱ्या दिवशी किंवा काही क्षणात तो खड्डा पुन्हा उघडा पडत होता.
तसेच गणेशोत्सवापूर्वी देखील या परिसरातील खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितले असताना देखील गणेशोत्सव विसर्जनच्या दिवसापर्यंत देखील या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पालघर नगर परिषदेत सह सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांच्या जीव जाण्याची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून पुढे येत आहे.
