पालघर : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण मर्यादित होत असून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तसेच असंसर्ग आजार नियंत्रणाबाबत जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे व विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जात असून अजूनपर्यंत नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व २८ उपकेंद्रांचे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. पुढील वर्षापर्यंत २३ प्राथमिक आरोग्य केंद्र व २०१८ पर्यंत सर्व ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे गुणवत्ता प्रमाणिकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणीकरण्याच्या दृष्टीने उपक्रम सुरू केल्यानंतर घोलवड (डहाणू) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सन २०१६ मध्ये तर जामसर (जव्हार) प्राथमिक आरोग्य केंद्राने सन २०१८ मध्ये प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली होती. करोना काळानंतर या गुणवत्ता आश्वासन प्रमाणीकरण कार्यक्रमाला पुन्हा हाती घेण्यात आल्यानंतर यापूर्वीच प्रमाणीकरण झालेल्या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुनर्प्रमाणीकरण कार्यक्रमासह आमगाव, तलवाडा, साखरशेत व साकुर या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे २०२४ मध्ये गुणवत्ता प्रमाणीकरण झाले. त्यानंतर सन २०२५ मध्ये भाताणे व नांदगाव (जव्हार) या प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली असून मार्च २०२६ मध्ये सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमाणीकरणाचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सद्यस्थितीत २९ उपकेंद्रांचे गुणवत्ता प्रमाणीकरण पूर्ण झाले असून सन २०२८ पर्यंत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन पूर्ण करण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन केले होते.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील इतर २९ प्राथमिक आरोग्य केंद्र यांना राज्यपातळीवरचे गुणवत्ता प्रामाणिकरण झाले असून या केंद्रांनी राष्ट्रीय मानांकनासाठी अर्ज केले आहेत. याचबरोबरीने सात उपकेंद्रांनी देखील राज्याच्या गुणवत्ता प्रमाणिकरणाचा मूल्यांकन टप्पा पार केला असून त्यांच्यामार्फत राष्ट्रीय मानांकनासाठी नियोजित आहेत. सद्यस्थितीत लातूर, उस्मानाबाद पाठोपाठ राज्यात पालघर जिल्ह्याचा क्रमांक गुणवत्ता प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

राष्ट्रीय मानांकन मिळण्यासाठी अडचणी

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणीकरण करण्यासाठी आरोग्य केंद्राला स्वतःच्या मालकीची इमारत असणे आवश्यक असून ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ४२ आरोग्य केंद्र स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये सध्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे उपकेंद्राला हे प्रमाणीकरण मिळण्यासाठी त्या केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असणे आवश्यक असून सध्या जिल्ह्यात असणाऱ्या सुमारे ३०० उपकेंद्रांपैकी जेमतेम १६० उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असून उर्वरित केंद्रांसाठी गुणवत्ता प्रमाणीकरण कार्यक्रमात मर्यादा येणार आहे.

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांचे प्रमाणीकरण

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून १२ आरोग्य संस्था (ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय) यांचा प्रसूची कक्ष व शस्त्रक्रिया गृहाचा गुणवत्ता कार्यक्रम हाती घेण्यात आला असून जव्हार व डहाणू उपजिल्हा रुग्णालय हे पुनर्प्रमानीकरण प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.