पालघर : पालघर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली असून या पावसाळ्यापूर्वी ही काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे डहाणू ते वरई फाटा तसेच मनोर- वाडा- भिवंडी रस्त्यांवरील अपूर्ण असणाऱ्या कामांमुळे वाहन चालकांना होणाऱ्या गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे.

डहाणू पारनाका ते वरई फाटा (सफाळे) या प्रमुख राज्यमार्ग ४ वरील दरम्यानच्या ५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्या च्या काही भागात रुंदीकरण, डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण करण्यासाठी २४८ कोटी रुपयांचा कामाला गेल्यावर्षी आरंभ झाला होता. वाढवण बंदराच्या अनुषंगाने डहाणू तालुक्यातील या रस्त्याची काँक्रिटीकरण करावे या प्रस्तावाला मुख्यमंत्री यांनी मंजुरी दिली होती. या रस्त्याचे डहाणू पारनाका परिसरातून काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यापुढे वरोर- चिंचणी भागात हे काम पूर्ण करण्यात येत आहे. याच मार्गावरील पालघर शहरात जिल्हा मुख्यालय संकुलापासून शिक्षक पतपेढी भवन दरम्यानच्या रस्त्याच्या भागात रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

हायब्रीड ऍन्यूटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात पालघर- माहीम दरम्यानच्या रस्त्यावर काही ठिकाणी बॉक्स पाईप मोऱ्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ते तांदुळवाडी दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रमुख राज्य मार्गालगत अनेक ठिकाणी अतिक्रमण व अवैद्य बांधकाम झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रस्ता उभारणीसाठी जागा मोकळी करण्या च्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली.

मनोर- वाडा रस्त्याचे काम सुरू

मनोर- वाडा दरम्यान रस्त्याच्या कामाला गेल्यावर्षी आरंभ झाला असून या २३ किलोमीटर लांबीच्या पट्ट्या पैकी पावसाळ्यापूर्वी ११.५० किलोमीटर लांबीच्या दोन मार्गीकांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. या चार पदरी मार्गाचे पुढील वर्षी मार्च अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. या रस्त्या च्या उभारणीत काही ठिकाणी वनविभागाच्या जमिनीच्या संपादनाचा प्रश्न याबाबत निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात प्रकरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजय जाधव यांनी लोकसत्ताला सांगितले.

बोईसर चिल्हार रस्त्याचे नूतनीकरण

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या १९.३० किलोमीटर लांबीचा रस्ता हा गेली अनेक वर्ष एमआयडीसी च्या ताब्यात होता.

या रस्त्याचे चौपदरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी १९५ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण संदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर या रस्त्याचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात येणार आहे. जून २०२७ पर्यंत च्या काळात या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती चे काम एमआयडीसीच्या अंतर्गत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली.

डहाणू तालुक्यातील वाणगाव रानशेत या १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला देखील १५५ कोटी रकमेस मंजुरी मिळाली असून त्यामुळे चारोटी ते वाणगाव या प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे. या लांबी मध्ये रस्त्याचे काँक्रीटिकरण्यासह दुपदरीकरण तसेच भौमितिक सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

प्रकल्पांमुळे बाधित रस्ते मात्र दुर्लक्षित !

पालघर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अनेक राष्ट्रीय प्रकल्पांच्या उभारणीदरम्यान सुरू असलेल्या गौण खनिज व इतर अवजड वाहतुकीमुळे १५० किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते खराब झाली असून त्यांच्या दुरुस्तीसाठी विमान ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. प्रकल्प सुरू असताना प्रकल्प व्यवस्थापक मंडळी हा निधी घेण्याची कबूल केले होते. मात्र या देवीची सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी केल्यानंतर राज्य सरकारने हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी भूमिका घेण्यात आली. सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत नव्याने निधी मंजूर होणे कठीण झाले असल्याने पुढील वर्षी पर्यंत पालघरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना खड्ड्या मधूनच प्रवास करण्याची परिस्थिती ओढवणार आहे.