पालघर : पालघर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध राष्ट्रीय प्रकल्पांकरिता अवजड वाहतूक केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीखालील सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दैना झाली असून त्यांच्या दुरुस्तीसाठी या विभागांनी तब्बल ४९ कोटी रुपयांची मागणी केली होती. या निधीची उपलब्धता न झाल्याने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यामधून प्रवास करणे भाग पडणार आहे.

पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा द्रतगती मार्ग, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन तर्फे विरार ते डहाणू रोड दरम्यान होणारे चौपदरीकरण, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन तर्फे उभारण्यात येणारा बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच गेल्या वर्षी कार्यरत झालेल्या समर्पित रेल्वे मालवाहू मार्गाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू होते. या प्रकल्पांसाठी गौण खनिज (माती, मुरूम, दगड, खडी इत्यादी) वस्तूंची वाहतूक करताना तसेच या प्रकल्पासाठी विविध उपकरणे व साहित्य आणताना झालेल्या अवजड वाहतुकीमुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू, वसई, तलासरी व पालघर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीखालील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित राष्ट्रीय प्रकल्पाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी मागणी करण्यात आली होती.

मात्र प्रकल्प प्रवर्तक यांनी रस्त्यासाठी निधी देण्यासाठी असमर्थता दर्शवली असून हे काम राज्य सरकारने या कामी खर्च करावा अशी भूमिका घेतली आहे. खराब झालेल्या रस्त्यांपैकी अनेक रस्त्याचा दोषदायित्व कालावधी प्रलंबित असल्याने त्यावर खर्च करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य नाही. तसेच या निधीला जिल्हा विकास योजने मधून मंजूर होण्यास निवडणूक आचारसंहितेचा अडथळा झाला होता.

पावसाळा सुरु होण्याच्या तयारीत असून या रस्त्याची दुरुस्ती करिता निधी उपलब्ध न झाल्याने या रस्त्यावरील खड्डे कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता पावसाळ्या दरम्यान रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करणे व पावसाळ्यानंतर या रस्त्यांच्या दुरुस्ती मजबुतीकरण डांबरीकरणासाठी उपाय योजना आखण्यात येतील असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले. प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या काही रस्त्यांवर संबंधित ठेकेदारांनी खड्डे भरण्याचे काम हाती घेतले असले तरी अधिकतर रस्ते दुसरलक्षित राहिले आहेत.

टेंभीखोडावे पुलाचे काम अजूनही सुरू नाही

जलसार व टेंभीखोडावे गावांतर्गत असणाऱ्या पाईप मोरीला तडा गेल्याने त्यावरून अवजड वाहतूक करणे कठीण व धोकादायक झाले आहे. या रस्त्यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठेकेदाराला दुरुस्तीसाठी पाचरण करण्यात आले होते. मात्र या पाईप मोरीचे काम अजूनही सुरू झाले नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. याच बरोबरीने कपासे ते केळवा रोड दरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर प्रकल्पाच्या ठेकेदारांनी रस्त्याच्या काही भागात दुरुस्ती केल्याचे सांगण्यात आले. मात्र दुरुस्तीचा दर्जा सुमार असल्याने दुरुस्त केलेल्या रस्ता पावसाळ्यात पुन्हा उघडून जाईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करणार

राष्ट्रीय प्रकल्पांच्या उभारणी दरम्यान जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान माध्यमां समोर प्रतिपादन केले होते. या रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल असे मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले. असे असले तरीही हा निधी पुढील अधिवेशन काळात मंजूर होण्याची शक्यता असून पालघरवसीयांसाठी यंदाचा पावसाळा खड्डेमय राहण्याची शक्यता आहे.

खराब झालेल्या रस्त्यांचा तपशील

पालघर तालुक्यात बोरशेती ते रावते (८५० मीटर), पेनंद ते घाटीम (२४०० मीटर), नावजे ते दहिसर फाटा व गिराळे ते पारगाव (२१०० मिटर), पालघर ते माहीम चौकीपाडा (२२५० मिटर), केळवे रोड ते कपासे (२००० मिटर) व नवली ते वरखुंटी (३९५९ मीटर) रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालघर तालुक्यामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे १८.४१ कोटी रुपयांची गरज असून रस्ते खराब होण्यासाठी तालुक्यात उभारणीचे काम असणारे तिन्ही राष्ट्रीय प्रकल्प कारणीभूत ठरले आहेत.

डहाणू तालुक्यात वाणगाव, साखरे, रानशेत या प्रमुख जिल्हा मार्गावर (१२.४० किलोमीटर) रस्ता खराब झाला असून दापचरी- वंकास- बहारे दरम्यानच्या प्रमुख जिल्हा मार्गावर पाच किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे. याखेरीस वेवजी- आंबेसरी ते राज्य मार्ग क्रमांक ७५ दरम्यानचा ६५०० मिटर व ऐना-दाभोण- शिगाव या प्रमुख जिल्हा मार्गावर तीन किलोमीटर रस्त्याचा भाग खराब झाला आहे. या दुरुस्ती, मजबुती व रस्ते सुधारणा करण्याच्या कामासाठी १८.६५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार असून यासंदर्भात २.७० कोटी रुपयांची मागणी बुलेट ट्रेन प्रकल्पाकडून व उर्वरित निधी मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाकडून करण्यात आली आहे.

तलासरी तालुक्यात देवजी- आंबेसरी ते राष्ट्रीय महामार्ग ७५ ला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्गाचा दोन वेगवेगळ्या भागात साडेतीन किलोमीटर व अडीच किलोमीटरचे दोन स्वतंत्र पट्टे खराब झाला झाले आहेत. तसेच राष्ट्रीय मार्ग ७३ पासून वसा- कवाडा (६०० मिटर) व उधवा- खेर्डी (८०० मीटर) या रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. याच बरोबरीने राष्ट्रीय महामार्ग ८ ते उपलाट कोचाई दरम्यानच्या प्रमुख जिल्हा मार्गातील ३१०० मीटरचा पट्टा खराब झाला असून या कामांच्या दुरुस्तीसाठी ७.४५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

या सर्व रस्त्यांची दुरवस्था नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे झाल्याचा उल्लेख मागणी पत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. वसई तालुक्यातील समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या उभारणीत एसटी डेपो पारनाका ते अंबाडी दरम्यानच्या २१०० मीटरचा पट्टा खराब झाला असून बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे एसटी डेपो पारनाका, अर्नाळा, विरार, शिरसाट, अंबाडी रस्त्यावरील ९०० मीटरच्या भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी एकूण ४.२० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.