पालघर : पालघर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध राष्ट्रीय प्रकल्पांच्या अनुषंगने पायाभूत सुविधांचा उंचाविला जाणारा स्तर पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापन करण्याला मान्यता दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश असून पालघर व्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय अस्तित्वात आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे कार्यालय अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात त अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राचा समावेश असून सन २०१४ मध्ये स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना पहाता तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यांची व्याप्ती पाहता बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील कामांचा भार ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयावर येत होता. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध राष्ट्रीय प्रकल्पांच्या दृष्टिकोनातून या या विभागाअंतर्गत कामांची व्याप्ती वाढली असून पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापन करण्याची विनंती लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाने १० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे पालघर जिल्ह्यासाठी नवीन मंडळ कार्यालय स्थापन करून त्याला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पालघर असे देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातून नागरिकांना विविध कामांसाठी ठाणे येथे प्रवास करण्याऐवजी जिल्हा मुख्यालयाच्या लगत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात येणे सहज व सोपे होणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय दृष्ट्या आदिवासी भवन क्षेत्रातील सद्यस्थिती सुरू असलेल्या कामांवर निरीक्षण व नियंत्रण ठेवले विभागाच्या अधिकाऱ्यांना सुलभ व सोयीचे होईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा उन्नत करण्याच्या दृष्टीने पालघर येथील नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्याची बाब शासनाने मान्य केली आहे.

उपविभागीय कार्यालय

पालघर सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय अंतर्गत पालघर, जव्हार व कोकण भवन येथील आदिवासी विभाग यांचा समावेश करण्यात आला असून या प्रत्येक विभागीय कार्यालया अंतर्गत उपविभाग निश्चिती यापूर्वी करण्यात आली आहे.

कार्यालयासाठी पदस्थापना

अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयासाठी अधीक्षक अभियंता यांच्यासह एक उप अभियंता दोन कनिष्ठ/शाखा अभियंता यांच्या पदाला मंजुरी देण्यात आली असून त्यांच्यासह प्रत्येकी एक उच्च श्रेणी लघु लेखक, प्रमुख आरेखक, अधीक्षक, प्रथम लिपिक सहाय्यक आरेखक तसेच एक नाईक या पदांना मंजुरी देण्यात आली असून वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक यांच्यासाठी प्रत्येकी चार जागा मंजूर करण्यात आले हे. त्यास बरोबरीने बाह्य यंत्रणेमर्फत प्रत्येकी एक वाहनचालक व चौकीदार यांच्यासह चार शिपाई यांना देखील मान्यता देत असल्याची माहिती या सदर्भात जारी आदेशात उल्लेखित करण्यात आली आहे.