पालघर : पालघर जिल्ह्याच्या आगामी काळात होऊ पाहणाऱ्या प्रकल्पांच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी तसेच दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या कामांवर सध्या ठाणे येथील अधीक्षक अभियंता यांच्यामार्फत देखरेख ठेवली जात असून पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता हे पद निर्माण व्हावे यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रतिपादन केले.

जिल्हा नियोजन समितीच्या ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी रस्त्यांची झालेली दुरवस्था व रेंगाळलेल्या कामांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यात होऊ पाहणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्ह्याचे वाढणारे महत्त्व बघून रस्त्यांचा विकास करणे महत्त्वपूर्ण असल्याकडे पालकमंत्री यांनी लक्ष वेधले. सध्या रस्त्यांची काम वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा मार्फत राबविली जात असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे येथील अधीक्षक अभियंता यांच्याप्रमाणे पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र पद निर्माण करावे अशी मागणी पुढे आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याचा आपण पाठपुरावा करू असे पालकमंत्री यांनी या बैठकीत सांगितले.

मनोर- वाडा- भिवंडी या राज्यमार्गाच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला असता या रस्त्यावर शेकडो अपघात होऊन किमान १०० लोकांचा मृत्यू ओढवला असून अनेकांना अपंगत्व आले आहे असे खुद्द पालकमंत्री यांनी सांगितले. या राज्यमार्गाच्या सद्यस्थितीची माहिती पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकर्ते अभियंता महेंद्र किणी यांनी देताना पावसाळ्यापूर्वी नियमित खराब होणारे रस्त्याचे पट्टे व एका दिशेच्या मार्गाचे काँक्रिटीकरण काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम ठाणे अधीक्षक अभियंता यांच्या देखरेखी खाली होत असल्याने गणेश नाईक यांनी यासंदर्भात मंत्रालय स्तरावर आढावा बैठक घेण्याचे सूचित केले.

पाली- विक्रमगड- तलवाडा या हायब्रीड ऍन्युटी अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये झालेल्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असल्याचे व हे दुरुस्तीची काम पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी संबंधितांना सूचित केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.

गोऱ्हे- कंचाड या रस्त्यावरून गौण खनिजची वाहतूक करणारे अनेक अवजड वाहन जात असल्याने त्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे मान्य करत या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात मागणी केल्याची माहिती देण्यात आली. बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग तसेच पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणामुळे अनेक अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करण्यासाठी संबंधित प्रकल्प व्यवस्थापनाकडून निधी मागवण्यात आला आहे. यासंदर्भात दर आठवड्याला संबंधित प्रकल्प व्यवस्थापन प्रतिनिधींसोबत आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी याप्रसंगी दिली.

वसई ते वर्सोवे पूल दरम्यान वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई ते वर्सोवा खाडी पुलादरम्यान नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडे पालकमंत्री यांनी विचारणा केली असता मुंबई, ठाण्यामध्ये अवजड वाहनांना प्रवेशासाठी निर्बंध असून अशी वाहन वसई पलीकडे तीन मार्गिका असणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या एका बाजूला उभ्या केल्या जातात. त्यामुळे उर्वरित दोन मार्गिकेवरून प्रवास करताना वाहतूक कोंडी होऊन परिणामी लांब रांगा लागत असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

वाहतूक शिस्त व नियमनासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

गुजरात मध्ये शिस्तीमध्ये मार्गिका नियम पाळणारी अवजड वाहने महाराष्ट्र मध्ये प्रवेश केल्यावर बेशिस्त का वागतात व त्यावर उपाय करण्यासंदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून लक्ष वेधले आहे. या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे त्यांनी बैठकीदरम्यान विचारणा केली असता परिवहन मंडळाच्या विद्यमाने मार्गिका शिस्त व वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध स्वयंचलित दंडात्मक चलन करणारे कॅमेरे बसविण्याचे योजना अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. पालघर जिल्ह्यातील ११३ किलोमीटर महामार्गाच्या पट्ट्यात हे कॅमेरे बसवण्यात येणार असून या कामाचे कार्यादेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी पाठपुरावा करावा व निधीची आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन अथवा सामाजिक दायित्व फंडातून मागणी करण्याची त्यांनी सूचना केली.