पालघर : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने रेशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याची ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यात अजूनही तब्बल ३ लाख ७५ हजार ९६५ लाभार्थ्यांची ई-केवायसी नोंदणी प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुदत संपूनही जिल्ह्यातील हजारो कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या एकूण उद्दिष्टांपैकी आतापर्यंत १४ लाख १३ हजार २४३ लाभार्थ्यांचे ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत ३९,५१४ नव्या लाभार्थ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, तरीही जिल्ह्यातील सुमारे २१ टक्के लाभार्थ्यांची नोंदणी प्रलंबितच राहिली आहे.

शहरी व ग्रामीण भागातील आव्हाने

आकडेवारीचे विश्लेषण केल्यास वसई तालुक्यात सर्वाधिक १ लाख ५ हजार ९५७ लाभार्थी प्रलंबित आहेत. वसईत गेल्या १५ दिवसांत २५ हजारहून अधिक नागरिकांनी ई-केवायसी पूर्ण केले असले, तरी शहरी भागातील स्थलांतरित कामगार आणि वेळेअभावी प्रलंबित राहिलेल्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे, डहाणू, पालघर आणि जव्हार-मोखाड्यासारख्या दुर्गम व आदिवासी भागांत नेटवर्कच्या समस्या, ई-पॉस मशिनमधील तांत्रिक अडचणी आणि बायोमॅट्रिक ठसे न जुळणे यांमुळे कामाचा वेग मंदावला आहे.

धान्य बंद होण्याचे सावट, नागरिकांमध्ये चिंता

३० सप्टेंबरची मुदत संपल्याने ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही, त्यांचे रेशनचे धान्य बंद होणार की प्रशासनाकडून मुदतवाढ मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रेशन दुकानांवर बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे किंवा घरबसल्या ‘मेरा ई-केवायसी’ आणि ‘फेस ई-केवायसी’ अ‍ॅपद्वारे नोंदणी करण्याची सोय अद्याप उपलब्ध आहे.

कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. ज्या नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांनी तातडीने रेशन दुकानात जाऊन किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे ती पूर्ण करून सहकार्य करावे. शासनाने अद्याप मुदत संपल्याचे निर्देश दिले नसल्याने कार्डधारकांनी इ केवायसी करून घ्यावे. जर रेशन बंद झाले तर सर्वस्वी जबाबदारी ही कार्ड धारकाची असेल.-सीमा महल्ले, जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर

तालुकानिहाय प्रलंबित ई-केवायसी स्थिती
वसई: पूर्ण – ४,२१,०६५ , प्रलंबित – १,०५,९५७
(१६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान झालेले काम – २५,७५८)

डहाणू – पूर्ण – २,६१,१५८ , प्रलंबित – ७५,४६६
(झालेले काम – ३,०५५)

पालघर – पूर्ण – २,५९,०२३ , प्रलंबित – ५९,४४९
(झालेले काम – २,१८९)

वाडा – पूर्ण – १,०३,४६३ , प्रलंबित – ३३,४८५
(झालेले काम – २,८०२)

जव्हार – पूर्ण – ९५,६४९ , प्रलंबित – ३२,८५२  
(झालेले काम – १,२४९)

विक्रमगड – पूर्ण – १,१२,८८७ , प्रलंबित – २६,०१७
(झालेले काम – २,३६५)

तलासरी – पूर्ण – १,०३,०७७ , प्रलंबित – २३,९४८
(झालेले काम – ६३८)

मोखाडा: पूर्ण – ५६,९२१ , प्रलंबित – १८,७९१
(झालेले काम – १,४५८)

एकूण जिल्हा – पूर्ण – १४,१३,२४३ , प्रलंबित – ३,७५,९६५
(झालेले काम – ३९,५१४)