पालघर : पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती दरम्यान निर्माण झालेली गुंतागुंत वेळीच ओळखली गेल्याने तसेच पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने या गर्भवती महिलेची तातडीने प्रसूती शस्त्रक्रिया (सिझेरियन) केल्याने अप्रिय घटना टळली. पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समूहाच्या सांघिक प्रयत्न व समयसूचकतेमुळे बाळ- बाळंतीण सुखरूप आहे.

पालघर तालुक्यातील गिरनोळी खुताडपाडा येथील ३० वर्षीय महिला तिसऱ्या खेपेच्या प्रसुतीसाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल झाली होती. दुपारी दीड- दोन वाजल्याच्या सुमारास तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली वलटे या त्याकडे देखरेख ठेवून होत्या. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश दुम्पलवार क्षेत्रभेट व इतर गृह भेटी च्या कामानिमित्ताने हे नंडोरे येथे गेले होते.

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास या महिलेच्या प्रसुती दरम्यान बाळाचा हात बाहेर आल्याचे निदर्शनास आले. प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने तसेच ही प्रसूती अवघड व जोखीम्याची झाल्याने डॉ. वलटे यांनी डॉ. दुम्पलवार यांच्याशी संपर्क साधला. या महिलेला पालघर ग्रामीण रुग्णालय तातडीने हलवण्याचे त्यांना सूचित करण्यात आले. रुग्णाच्या हस्तांतरण (ट्रान्सफर) प्रक्रिये दरम्यान मातेला प्राणवायू पुरवठा देणे तसेच बाळाचा हात कोरडा न पडून देण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले.

दरम्यान पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ डॉ. दिलीप यादव व भूलतज्ञ डॉ. राजेश सिंह यांनी सकाळच्या सत्रात चार प्रसुती शस्त्रक्रिया (सिझेरियन) व दोन कुटुंब शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्यासह परिचारिका व इतर ऑपरेशन थिएटर कर्मचारी व्यस्त राहिले होते. डॉ. दुम्पलवार पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला जोखीमेच्या शस्त्रक्रिया प्रसूती करण्याच्या आवश्यकते संबंधात माहिती देऊन या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण पथक व ऑपरेशन थिएटर सज्ज ठेवण्यात आले.

मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला १५ मिनिटांमध्ये रुग्णवाहिकेतून पालघर ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया सुरु केल्यानंतर १० मिनिटात बाळ जन्माला आले. मात्र आरंभी या बाळाला श्वास घेणे कठीण होत असल्याने नवजात शिशु संगोपनासाठी असणाऱ्या विशेष कक्षामध्ये या बाळाला हलवून त्याला आवश्यक उपचार व देखभाल करण्यात आली.

मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पालघर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समय सूचकता, संघ भावनेने केलेली तातडीची शस्त्रक्रिया यामुळे माता व बालकाचे प्राण वाचला. सध्या या बाळावर पालघर येथील डॉ. एम एल ढवळे ट्रस्टच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डॉ. उमेश दुम्पलवार यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडण्या सोबत तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय पथकाला केलेल्या मदतीबद्दल त्यांचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया

डिसेंबर २०२५ मध्ये माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात एका रविवारी नियमित प्रसूती करताना डॉ. मृण्मयी मयेकर व सोबत च्या परिचारिका यांना प्रसुती दरम्यान महिलेच्या गर्भपिशवीचा भाग बाहेर आल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे प्रसूतीनंतर रक्तस्त्राव सुरू राहल्याने त्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारया डॉ. उमेश दुम्पलवार यांच्याशी संपर्क साधून या महिलेवर पालघर ग्रामीण रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी देखील माता बालकाचे प्राण वाचवण्यास वैद्यकीय पथकाला यश आले होते. शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेकदा टीका होत असताना अलीकडच्या काळात पालघर ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आलेल्या तातडीच्या प्रसूत शस्त्रक्रिया महत्वपूर्ण व प्रशंसनीय ठरल्या आहेत.