पालघर : एप्रिल २०२३ मध्ये ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला एक्स-रे काढण्यास सांगितल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील संबंधित विभाग बंद असल्याने रुग्णाने क्ष किरण विभागाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर ग्रामीण रुग्णालयाने कार्यवाही अहवालात दोन वर्षानंतर उत्तर दिले. रुग्ण रुग्णालयात आला नसून संबंधित विभाग सुरू असून तेथे कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा ग्रामीण रुग्णालयाने केला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
१२ एप्रिल २०२३ रोजी एड. प्रथमेश प्रभू तेंडोलकर यांचा अपघात झाला होता. यावेळी ते उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले होते. केस पेपर काढून तपासणी करिता गेले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी केस पेपरवर एक्सरे काढणे असा शेरा नमूद करून दिल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या क्ष किरण विभागात नेले. मात्र त्यावेळी विभागाला टाळे लावून विभाग बंद होते. याबाबत चौकशी केली असता कर्मचारी नाहीत. उद्या येऊन चौकशी करा असे सांगितल्यामुळे इतर खाजगी ठिकाणी जाऊन एक्स-रे काढण्यात आला असल्याचे एड. प्रथमेश यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तसेच संबंधित विभाग बंद असल्याबाबत लोकसत्ता सह इतर वृत्तपत्रांमध्ये देखील त्यावेळी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र या तक्रारीवर २४ एप्रिल २०२५ रोजी तब्बल दोन वर्षानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांना ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी योग्यता कार्यवाही करिता कार्यवाही अहवाल सादर केला. या कार्यवाही अहवालात १२ एप्रिल २०२३ रोजीच्या नोंदवहीची तपासणी केली असता संबंधित रुग्ण उपचाराकरिता रुग्णालयात आल्याची नोंद आढळली नाही. तसेच त्या दिवशी क्ष किरण विभाग सुरू असून त्या विभागात कर्मचारी कार्यरत असून संबंधित रुग्ण क्ष किरण विभागांमध्ये क्ष किरण काढण्यासाठी गेल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले आहे.
या प्रकरणात एड. प्रथमेश हे प्रत्यक्ष त्या दिवशी तेथे गेल्याचे व केस पेपर काढल्याची त्यांच्याकडे नोंद असून त्यानंतर बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. तर रुग्णालयात ते गेले नसून क्ष किरण विभाग सुरू असल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला असून चुकीच्या अहवालामुळे ग्रामीण रुग्णालय किती कार्यक्षम आहे याबाबत संशय निर्माण होतो.
तसेच दोन वर्षांपूर्वी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीप्ती गायकवाड यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात सोनोलॉजिस्ट हे पद मंजूर नसून फक्त एक एक्स-रे तंत्रज्ञ कार्यरत असल्याने हा कर्मचारी सुट्टीवर असल्यास गरजू रुग्णांना खाजगी केंद्रात पाठवावे लागत असल्याचे त्यांनी त्यावेळी लोकसत्ता ला सांगितले होते. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित प्रकरण आपल्याला माहीत नसून याबाबत चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
आपले सरकार पोर्टलवर दाखल करण्यात आलेली तक्रार हेतू पुरस्सर शासनाला खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. मी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर केस पेपर काढला होता, चौकशी कक्षावर चौकशी केली होती तसेच माझ्यासह अनेक रुग्ण हे तात्काळ क्ष किरण विभागाकडे बसले होते. असे असताना प्रशासन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच मागील आठवड्यात त्यांनी परस्पर तक्रार बंद केली आहे.
एड. प्रथमेश प्रभू तेंडोलकर, तक्रारकर्ता
मी स्वतः प्रथमेश याला अपघात झाल्यामुळे रुग्णालयात गाडीवरून घेऊन गेली होती. त्यावेळी मी नोंद पेपर काढून तपासणी करिता नेले होते. माझ्यासह अन्य सहकारी देखील तेथे उपस्थित असताना क्ष किरण विभाग बंद असल्याबाबत आम्ही विचारणा केली होती.
मयुरी सावंत
दोन वर्षांपूर्वी मी रुग्णालयात कार्यरत नव्हतो. मात्र माझ्याकडे ही तक्रार आल्यानंतर त्वरित मी दोन वर्षांपूर्वीची यादी तपासण्याच्या सूचना दिल्या. यादीमध्ये या रुग्णाची नोंद नसल्याने तसेच क्ष किरन विभाग सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तरी याबाबत पुढील काही दिवसात चौकशी करण्यात येईल.
डॉ. चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पालघर