पालघर: सफाळे येथील विळंगी भागात एका घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दरोडेखोरांनी घरात घुसून दोन राऊंड फायर करत, बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लांबवले. गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत घराभोवती गर्दी केल्यामुळे दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. डहाणूतील ज्वेलर्सवरील दरोड्यानंतर आता ग्रामीण भागातही असा सशस्त्र दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे. ११ वर्षांपूर्वी देखील याच कुटुंबावर असा हल्ला झाला होता.

२७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सफाळे आगडवाडी जवळील विळंगी येथील मातोश्री बंगल्यात शांताराम पाटील व नलिनी पाटील हे दांपत्य रात्री एकटेच होते. याचवेळी मुख्य दरवाजातून टोपी व मास्क घालून चेहरा झाकलेल्या दोन अज्ञात इसमांनी हातात बंदुका घेऊन घरात प्रवेश केला. त्यांना पाहून नलिनी पाटील यांनी भीतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी लगेच आतून घराचा दरवाजा बंद केला.

दरम्यान शांताराम पाटील यांनी चोरट्यांच्या नकळत मुलगा ऋषिकेश याला फोन लावून घटनेची माहिती दिली. ही बाब लक्षात येताच दरोडेखोराने शांताराम पाटील यांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, शांताराम पाटील खाली वाकल्यामुळे त्यांचा नेम चुकला. यानंतर दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून नलिनी पाटील यांच्या हातातील बांगड्या (खोट्या), गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील दागिने जबरदस्तीने खेचून काढले.

मुलगा ऋषिकेशने तत्काळ गावातील मित्रांना फोन केल्याने काही वेळातच गावकरी बंगल्याबाहेर जमा झाले. बाहेर लोकांची गर्दी झाल्याचे दिसताच दरोडेखोरांनी भीती दाखवण्यासाठी उपस्थितांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले. सुदैवाने या दरम्यान कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर दरोडेखोर माकुणसार पर्यंत पळत गेले. त्यानंतर त्यांनी मायखोप-केळवे रपरिसरात एक दुचाकी (चोरीची असण्याची शक्यता) ताब्यात घेतली. शांतीशील हॉटेलजवळ पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण तेथून त्यांनी पळ काढला. पुढे माहीम तलाव बाजार (आंबेडकर नगर) जवळ पोलिसांनी रस्त्यात वाहन आडवे लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तिथेही चकवा देऊन ते पाणेरी परिसरात निसटले. Tyanantr पालीपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी सोडून दरोडेखोरांनी शेतीवाडी व गवती भागात पलायन केले.प

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

घटनेनंतर केळवे आणि सातपाटी पोलीस दलासह शीघ्र कृती दल, वाहतूक पोलीस, दोन श्वान पथके, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांच्या अनेक तुकड्या पाणेरी ते विळंगी दरम्यानचा संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहनांची कसून तपासणी सुरू असून दरोडेखोरांचा कसून शोध सुरू आहे.

डहाणूनंतर ग्रामीण भागात दरोडा

डहाणू शहरातील न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर २० जुलै रोजी भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून मोठा मुद्देमाल लांबवण्यात आला होता. या घटनेतील आरोपींना नुकतेच पकडण्यात आले असून आता विळंगीसारख्या ग्रामीण भागात दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.

पार्श्वभूमी दहा वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

विळंगी येथील शांताराम पाटील यांच्या कुटुंबावर ११ वर्षांपूर्वी 18 एप्रिल 2015 रोजी मुलगा ऋषिकेश पाटील याच्यावर सुद्धा गोळी झाडण्यात आली होती यामध्ये तो जखमी झाला होता. यावेळी दरोडेखोरांनी 80 हजार रुपयांच्या नलिनी पाटील यांच्या हातातील बांगड्या चोरल्या होत्या. या घटने दरम्यान देखील दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यावेळी जखमी ऋषिकेशने नातेवाईक व गावकऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे हा दरोडा केवळ चोरीच्या उद्देशाने होता की त्यामागे काही अंतर्गत वाद आहे, या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.