पालघर: पालघर तालुक्यात सातपाटी व मुरबे या खाडी दरम्यान हजारोच्या संख्येने मृत मासे आढळले असून वातावरणातील अति उष्णता किंवा तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्रदूषित सांडपाणी यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या माशांवर पावसाळ्याच्या दरम्यान उपजीविका करणाऱ्या मच्छीमारांवर संकट ओढवले आहे.
आज दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास मुरबे – सातपाटी दरम्यान वाहणाऱ्या खाडी किनाऱ्यावर सातपाटी दांडा पाडा परिसरात मृत माशांचा खच पडल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर खाडीच्या मुखावर डोली पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात मासे प्राप्त झाले आहेत. या मध्ये छोट बोय, पोफील, सलपा आदी माशांच्या प्रजातीचा समावेश असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले आहेत.
दरम्यान स्थानिक मच्छीमारानी मोठ्या आकाराची बोय, खाजरी व सलपा मासे वेचून विक्रीसाठी नेल्याची माहिती पुढे आली आहे. आज (१ जून) पासून मासेमारी बंदी असल्याने बर्फ कारखाने बंद करण्यात आल्याने बर्फाची उपलब्धता झाली नसल्याने मोठे मासे वेचून इतर लहान माशाला समुद्र किनाऱ्यावर टाकून देण्याचे मच्छीमारांनी पसंद केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान हे मासे आगामी काळातील भरती सोबत पाण्यात पुन्हा वाहून न गेल्यास परिसरात दुर्गंधी पसरण्याची आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुरबे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची मासे अस्तित्वात असून या माशांमुळे अनेक कुटुंबीयांचा विशेषतः पावसाळ्यात उदरनिर्वाह होत असतो. विविध राष्ट्रीय प्रकल्पांच्या अभ्यासादरम्यान या खाडीत विशेष मत्स्यसंपदा नसल्याचे अहवाला नमूद करण्यात आले असून मासे मारण्याच्या या घटनेमुळे असे अभ्यास अहवाल परिपूर्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती आपल्याला सायंकाळी उशिरा प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मृत माशांचे नमुने गोळा करून ते परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येईल असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.
वाळीवाचा पाऊस झाल्यानंतर अथवा पहिल्या मुसळधार पावसानंतर तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या घातक घनकचरा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून खाडीत मिसळल्यानंतर असे प्रकार घडत असल्याचे यापूर्वी दिसून आले होते. तर यापूर्वी मासे भरण्याच्या काही प्रसंगी अति उष्णतेमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने अशा घटना घडल्याचे दिसून आले होते.
