पालघर : राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार साहित्य पुरवठा करण्यासंदर्भात ठेकेदारांसोबत होणारा करारनामा झाला नसल्याने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना मार्च व एप्रिल महिन्यात प्राप्त झालेल्या खाद्यपदार्थांने तयार केलेला आहार सेवन करणे भाग पडत आहे. यासंदर्भात शिक्षकांकडून स्थानीय पातळीवर हंगामी व्यवस्था केली जात असून राज्यस्तरावर निर्णय होईपर्यंत ही समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यातील २३७५ शाळांमधील पहिली ते आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दररोज पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचे वयोमान लक्षात घेऊन इयत्ता निहाय पोषण आहाराचे प्रमाण राज्य सरकारने निश्चित केले असून प्रत्येक शाळेतील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार दोन महिन्याला आवश्यक साहित्याची आगाऊ पद्धतीने मागणी केली जाते.
राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे वितरक निश्चित केले जात असून वितरण व्यवस्थे संदर्भात संबंधितांशी ठेका करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जून व जुलै महिन्यासाठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आगाऊ मागणी करूनही खाद्यपदार्थांचे साहित्य अजूनही अप्राप्त असल्याचे दिसून आले आहे.
काही शाळांमध्ये यापूर्वी असणारे अतिरिक्त खाद्यपदार्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांची भूक भागवण्याचे काम केले जात असून काही ठिकाणी जुन्या वितरकाकडून खाद्यपदार्थांचे साहित्य बनवण्यासाठी वस्तू मागवल्या जात आहेत. काही शाळांमध्ये शिक्षकांनी स्व:खर्चाने साहित्य विकत घेतले असून काही शाळांमध्ये शिक्षक आणि जवळच्या किराणामाल दुकानदारांकडून उधारीवर साहित्य आणण्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनेक शाळांनी पोषण आहार दिल्याच्या नोंदी चव वही किंवा अन्य ठिकाणी केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात खिचडी, हळद टाकलेला भात विद्यार्थ्यांना दिला जात आहे. राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय होत नसल्याने खालील पातळीवर पोषण शक्ती निर्माण योजनेच्या साहित्य पुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यास इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना जुन्या साहित्यावर उदरनिर्वाह करावा लागत आहे.
मार्च एप्रिल चे साहित्य उपयोगी
जिल्ह्यातील शाळांमध्ये मार्चपासून परीक्षा सुरू होत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात खाद्यपदार्थ दिले जात नसत. यासाठी त्यापूर्वी पुरवठा केलेल्या साहित्याचा वापर केला गेल्याची माहिती पुढे आली आहे. जुन्या ठेकेदार कंपनीने मार्च महिन्याचे साहित्य जून महिन्यात तर एप्रिल महिन्यात शाळांना द्यावयाचे साहित्य जुलै महिन्यात दिल्याने या पोषण साहित्याच्या आधारे अनेक शाळांमध्ये आहार देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. काही शाळांनी जुन्या ठेकेदाराच्या वाडा येथील साठागृहातून साहित्य घेऊन आल्याची अथवा पुरवठा करून घेतल्याची माहिती देखील पुढे आली आहे. जर मार्च व एप्रिल महिन्यातील धान्य व इतर साहित्य जून, जुलै महिन्यात दिले गेल्याचे सांगितले जात असल्यास त्या काळात काय दिले गेले ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठेकेदारांच्या संगमताने दोन महिन्याच्या पोषण आहार साठी असलेला निधी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला जात असून या प्रकारांत शासनाने चौकशी करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेनें केली आहे.
एफडीए कडून लक्ष देणे आवश्यक
राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी देण्यात येणारे खाद्यपदार्थांचे साहित्य असमाधान करत व निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. तसेच ५० किलो वजनाच्या साहित्य गोणीमध्ये ४२ ते ४५ साहित्य येत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून प्राप्त होत असून प्रत्येक शाळेमध्ये वजन मोजणी काटे नसल्याने ठेकेदाराकडून अनियमितता होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिवाय कडधान्य व इतर साहित्याच्या दर्जामध्ये देखील तडजोड केली जात असून अनेकदा हळदीला रंग न येणे, मटकीचा आकार लहान असते, हिरव्या वाटाणा ऐवजी पांढऱ्या वाटाण्याचा पुरवठा होणे तसेच दोन दिवस भिजत टाकूनही पांढरे वाटाणे न शिजण्याचे प्रकार घडले आहेत. राज्य स्तरावर वाटाणा वितरणाबाबत गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्याने प्रत्येक शाळेकडून गेल्या शैक्षणिक वर्षात प्राप्त झालेल्या वाटाण्याचे वजन व त्यामध्ये पांढऱ्या वाटाण्याचा समावेश याबाबत तपशील मागितल्याची माहिती पुढे आली आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे साहित्य
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये शाळांना विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या अनुषंगाने तांदूळ, वाटाणा, मुगडाळ, चवळी, मटकी, हरभरा, मसूर डाळ, मूग, तूर डाळ, सोयाबीन वडी, मीठ, हळद, मोहरी, जिरे, मसाला व खाद्यतेल अशा साहित्याचा पुरवठा राज्य सरकारने नेमलेल्या ठेकेदारामार्फत केला जातो.
श्रमजीवी संघटनेतर्फे ताटली मोर्चा
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे जून व जुलै हे दोन महीने उलटूनही वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना पी-एम पोषण योजने अंतर्गत धान्य, खाद्यसाहित्य व स्वयंपाक खर्चाचा निधी मिळालेला नाही. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा पोषणाचा हक्क मिळवण्यासाठी उद्या (३१ जुलै) येथून वाडा पंचायत समिती कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व पालकांकडून रिकाम्या ताटल्या वाजवत ताटली मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रलंबित अन्नधान्य व निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
शालेय पोषण आहार पुरवण्यास संदर्भात जिल्हयाची मागणी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे.- सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
