पालघर : जिल्ह्यात असणाऱ्या बालवाडी व शिशु वर्ग चालवणाऱ्या संस्थांची माहिती संकलित करून त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अनुरूप कार्यरत ठेवण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस व इतर वाहने तसेच शाळांमधील प्रवेशद्वार व वर्गांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी यांनी राज्यात घडलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित केले असता शिक्षण विभागाच्या अधिकारी त्यांचे समाधान केले.

शिशुवर्ग व बालवाडी चालवणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांची माहिती संकलित करून अशा शैक्षणिक संस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुरूप कार्यरत करत असल्याबाबत खातरजमा करण्याचे पालकमंत्री यांनी सुचित केले. राज्यात इतरत्र लहान विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचार प्रकाराच्या अनुशंघाने वाहतूक व्यवस्था करणाऱ्या वाहनांची माहिती संकलित करण्याचे देखील अशा संस्थांना सूचना देण्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस तसेच प्रायव्हेट वॅन मध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत सक्ती करण्याच्या सूचना लोक प्रतिनिधी यांनी दिल्या. निवडणूक, जनगणना व इतर काम करणाऱ्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) पदाची जबाबदारी देऊ नये अशी मागणी शिक्षक लोकप्रतिनिधी यांनी केली.

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या २०७ अंगणवाड्यांची दुरवस्था झाल्या असून शहरी क्षेत्रात असताना देखील त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेवर आर्थिक बोजा पडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तर सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृह असणे व त्यांची योग्य प्रकारे दुरुस्तीचे काम महिला दिनाच्यापूर्वी (८ मार्च) पूर्ण करण्यात येईल अशी आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिले. पालघर जिल्ह्यात २११२ शाळा असून त्यापैकी मोठ्या क्षमतेच्या २५९ शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत.

उर्वरित शाळांमध्ये प्रत्येकी तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत असून जिल्हा परिषदेच्या सेस फडातून आगामी तीन-चार वर्षात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण होईल असे मनोज रानडे यांनी माहिती दिली. यामुळे मध्यवर्ती कार्यालयातून शाळांमधील शिकवण्याकडे देखरेख ठेवणे शक्य होणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात महत्त्वाचे बदल सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचा अग्रक्रम ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले.

आपल्या नावाचा गैरवापर- पालकमंत्री

आपण अनेक वर्ष व्यवसाय करत असून स्व:कमाईवर समाधानी असल्याचे सांगितले. आपण आपल्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनात खूप समाधानी असल्याचे गणेश नाईक यांनी नमूद केले. कोणत्याही व्यक्तीला गरजे एवढाच पैसा जीवनात आनंद देतो व त्यामुळे आपण भ्रष्टाचाराच्या भानगडीत पडत नसल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री यांनी पालघर जिल्ह्यातील काही मंडळी आपल्या नावाचा गैरवापर करत असल्याचे जाहीर वक्तव्य केले. अशा मंडळींपासून जनतेने सावध राहण्याचे सूचना देत उपस्थित अधिकारी वर्गाने अशा दबाव तंत्राला बळी पडू नये असा सुतोवाच त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान केला. मात्र गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपांचा रोख नेमका कोणाकडे होता याबद्दल जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.