पालघर : पालघर येथील ज्येष्ठ विधी तज्ञ, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे तसेच प्रतीक सेवा मंडळाचे अध्यक्ष व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे एड. जी.डी तिवारी (८२) यांचे आज २६ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार कन्या असा परिवार आहे.
काँग्रेस विचारसरणीच्या घरामध्ये जन्म झालेल्या गिरिजाशंकर देवीदिन तिवारी यांनी पदवीनंतर विधी पदवी प्राप्त केली. १९७५ ते ८० दरम्यान पालघर मधील निवडक वकिलांपैकी ते एक होते. त्यावेळी दिवाणी दावे चालविण्यासाठी करिता डहाणू व मुंबईहून वकील येत असत. जी.डी तिवारी यांनी पालघर येथे पहिल्यांदाच दिवाणी दावे लढवण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या इंग्रजीमधील प्राबलल्यामुळे त्यांनी हे दावे न्यायालयासमोर इंग्रजीत प्रस्तुती करीत असत.




पालघर परिसरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी “पालघर वार्ताहर” नावाचे पाक्षिक काही काळ चालविले. पालघरच्या सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे संस्थापक सदस्य असणाऱ्या एडवोकेट तिवारी यांनी २००४ पासून सलग १९ वर्षे संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले. महाविद्यालयात अमुलाग्र बदल करत नवनवीन अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थी क्षमता वाढवीत ११ हजार पर्यंत नेली. प्रतीक सेवा मंडळाच्या कर्णबधिर शाळेत ९५ विद्यार्थी शिक्षण घेत या संस्थेच्या स्थापनेपासून जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी ते संबंधित होते.
एक हुशार आणि अभ्यासू वकील म्हणून जीडी तिवारी यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळवला. वकिलीच्या प्रवासात अनेक कनिष्ठ वकिलांना त्यांना त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ठेवा ज्ञानरूपात दिला. वयाच्या ६० वर्षापर्यंत वकिली निमित्त मुंबईच्या न्यायालयात जात असतात. पालघर तालुका काँग्रेस अध्यक्ष पदापासून राज्य कांग्रेस कार्यकारणी सदस्य या पदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास राहिला. पालघर शहरात काँग्रेस पक्षाच्या जागेत काँग्रेस संकुल, बहुउद्देशीय इमारत व सभागृह उभारण्यास त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. पालघरच्या लायन्स क्लब चे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय रक्त पुरस्कार, राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार, इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय स्तराचा आयबर्ड शैक्षणिक संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.