पालघर : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम शिरगाव समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी सहभागी होत शिरगाव समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन आणि जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव समुद्रकिनारी करण्यात आले.
या उपक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटराव हुंडेकर (महिला व बालविकास), अतुल पारसकर (स्वच्छ भारत मिशन), पालघर चे गटविकास अधिकारी संजय भोये, शिरगाव चे सरपंच घनश्याम मोरे, रिलायन्स फाउंडेशनचे योगेश जोशी, जिल्हा परिषद व प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या स्वच्छता अभियानात सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, सौ. यमुना यशवंत निजप विद्यालय, शिरगाव, जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल, शिरगाव यांच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला. या परिसरात असणाऱ्या शिरगाव किल्ल्याची देखील सफाई व स्वच्छता करण्यात आली.
जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहीम
कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली. स्वच्छतेचा संदेश देणारे बॅनर व जनजागृती साहित्य वापरून नागरिकांमध्ये समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. सर्व सहभागींच्या सुरक्षिततेसाठी मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले. सहभागींसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली.
रिलायन्स फाउंडेशनचे सातत्यपूर्ण सहकार्य
शिरगाव समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती सातत्याने सुरू राहावी यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून पुढाकार घेण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी आवश्यक स्वच्छता मशीनसाठी लागणाऱ्या खर्चासाठी सहकार्य करण्यात येत असून या कामी नियमित स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
स्वच्छतेसाठी सामूहिक सहभागाचा संदेश
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. ‘स्वच्छ शिरगाव – सुंदर शिरगाव’ या संकल्पनेतून समुद्रकिनाऱ्याची नियमित स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.
