पालघर तालुक्यातील शिरगाव येथे आयोजित ग्लोबल कोकण महोत्सव व मिनी सरस या महोत्सवामध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाच दिवस या महोत्सवात ४०० स्टॉल्स मधून अनेक बचत गट, मध्यम व लघुउद्योजक तसेच व्यावसायिकांना आपली उत्पादन नागरिकांपर्यंत पोहोचवता आली. याव्यतिरिक्त विशेष प्रसिद्ध नसलेल्या शिरगावचा समुद्र किनारा पर्यटकांच्या नकाशावर झळकला.

ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन गेल्या १२ वर्षांपासून असताना त्याचे आयोजन बहुतांश वेळी मुंबई, नवी मुंबई व अपवादात्मक वेळी परदेशी झाले होते. हा महोत्सव प्रथमच कोकणाच्या किनार्‍यावर अर्थात शिरगाव येथे आयोजित केला जात असल्याने आयोजकांना मर्यादित पायाभूत सुविधांमध्ये महोत्सवाचे आयोजन करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र दररोज ३५ ते ४५ हजार नागरिकांनी या महोत्सवात आनंद घेतला.

पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी भागाचा खर्‍या अर्थाने विकास झाला तो या भागात सुरू झालेल्या शैक्षणिक संस्थांच्या योगदानामुळेच. जिल्ह्यातील अनेक मान्यवर राज्यामध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहिल्याने तसेच अनेकांनी मंत्रिपद भूषवल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.

पालघर जिल्ह्याला सिंधुदुर्ग प्रमाणेच पर्यटन जिल्हा म्हणून रूपांतरित करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. जिल्ह्यात केळवे, अर्नाळा, बोर्डी सारखे प्रसिद्ध किनारे व मिनी महाबळेश्वर संबोधले जाणारे जव्हार व इतर पावसाळी पर्यटनाची ठिकाणे प्रसिद्ध असली तरी शिरगाव, दातिवरे, चिंचणी, नरपड, सूर्यमाळ व अशी अनेक ठिकाणे अजूनही प्रसिद्धी झोतात आलेली नाहीत. अशा महोत्सवाच्या निमित्ताने शिरगावला एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र म्हणून नावलौकिक मिळेल. इतर ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशाच प्रकारचे व वेगवेगळ्या विषय व थीम घेऊन महोत्सवांचे आयोजन करणे उपयुक्त ठरेल असे शिरगावच्या अनुभवावरून दिसून आले आहे.

पर्यटनाला चालना म्हणजे पायाभूत सुविधांचा विस्तार, विविध प्रकारची न्याहारी, निवासाच्या व्यवस्था, पंचतारांकित हॉटेल्स इतके मर्यादित नाही. या सोयीसुविधा आवश्यक तर आहेत पण त्याचबरोबरनी या भागातील निसर्ग संपदा वाढवण्यासाठी शासनाच्या प्रयत्नासोबत लोकसहभाग महत्त्वपूर्ण राहणार आहे. अनेक ठिकाणी नागरिकरण होत असल्याने वृक्षतोड केली जात आहे. शासना व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याच्या अपवादात्मक घटना आहेत. या भागाला पूर्वापार लाभलेले हरित क्षेत्र दाट करण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.

वनविभागाने पालघर येथे प्रशस्त निसर्ग उद्यान उभारण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. याच धर्तीवर विविध ठिकाणी नागरिकांना विसाव्यासाठी स्थळ निर्माण करणे आवश्यक झाले आहे. पूर्वी पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनार्‍यावर सुरूच्या बागेबरोबर केवड्याची बन होती. लिली, अबोली, शेवंती, गावठी गुलाब, मोगरा, कागडा, टगर सारखी फुलशेतीची लागवड होती. सध्या या भागात ऑर्किड सारख्या फुलाचे उत्पादन होत असून मुंबईची बाजारपेठ पालघरचे ऑर्किड गाजवत आहे. मात्र इतर फुलांच्या लागवडीच्या बाबतीत कालांतराने त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास वेगवेगळ्या कारणांमध्ये मागे पडले गेलो. फक्त पर्यटन विकास नव्हे तर आपला परिसर सुंदर बनवण्यासाठी विविध प्रकारच्या वृक्षांची नव्याने लागवड करणे गरजेचे ठरणार आहे.

पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला असणार्‍या नारगोळ या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीने मियावाकी वन क्षेत्र विकसित केले असून पर्यटकांचा त्याकडे ओढ लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात देखील असे महत्त्वकांक्षी प्रकल्प किनार्‍यालगत राबवायला हवेत. राज्य सरकारने बांबू लागवडीला उत्तेजन देण्याचे योजिले असल्याने त्यामार्फत देखील जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढवण्यास हातभार लागू शकेल.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असले तरीही जिल्ह्यातील पर्यटन हे एक दिवसीय सफरसाठी अधिकतर मर्यादित राहिले आहे. पर्यटकांचे जिल्ह्यातील वास्तव्य वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळी आकर्षण निर्माण करणे तसेच पर्यटकांसाठी टुरिस्ट सर्कल अर्थात क्लस्टर विकसित करणे आवश्यक झाले आहे. पर्यटनामुळे दळणवळण, खाद्य पदार्थ, स्थानिक कलाकृती उत्पादन करणे व अशा अनेक जोडधंद्याला उत्तेजन मिळत असून जिल्ह्याने विविध समाजांमधील खाद्यपदार्थांचा ठसा (फुट प्रिंट) निर्माण करणे देखील सहज शक्य आहे. पौराणिक मंदिर, विविध गड- किल्ले, साहसी खेळ (एडवेंचर स्पोर्ट्स) बीच स्पोर्ट्स हे तरुणाईचे आकर्षण झाले असून पालघरला राज्यातील पर्यटनाच्या नकाशावर अधिक समृद्ध बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ग्लोबल कोकण फेस्टिवल व मिनी सरस आयोजनासाठी शिरगाव हे ठिकाण निवडल्या बद्दल आयोजकांचे आभार मानणे आवश्यक आहे. मर्यादित पायाभूत सुविधा असताना वैभवशाली दालन व विविध अंगी नटलेला हा महोत्सव उभारणे हे आपण सर्वांसाठी जिकरीचे ठरले. तरी सर्व अडचणींवर मात करून सुंदर महोत्सव आम्हा सर्वांना अनुभवाला मिळाला. अशाच प्रकारे जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून शासनासह स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी संस्था, पर्यटन व्यवसाय व इतर संबंधित मंडळींचा सक्रिय सहभाग लाभला तर उत्तर कोकणाचे पर्यटन दृष्टिकोनातून नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल.