पालघर : आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची गावस्तरावर बांधणी मजबूत करण्यासाठी पक्ष संघटनेतील विविध रिक्त पदांवर नेमणूक करावी तसेच संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालघर येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात प्रतिपादन केले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन पालघर येथे करण्यात आले होते. यावेळी गृह महसूल ग्रामविकास व इतर विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेतील जेष्ठ पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, वसंत चव्हाण, नीलेश तेंडुलकर, महिला आघाडीच्या ज्योती मेहेर, वैदेही वाढाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्याला शाखाप्रमुखापासून जिल्हाप्रमुखापर्यंत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून संवादाद्वारे त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचे होत्या. तसेच संघटना वाढीसाठी बाधक ठरणाऱ्या विषयांवर चर्चा करायची होती असे आरंभी नमूद करत कार्यकर्त्यांची गर्दी बघून खासदार श्रीकांत शिंदे काहीसे संतापले. नंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना संघटना बांधणी संदर्भात संबोधित केले. आगामी बैठकीत आपण फक्त पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधणार असल्याचे त्यांनी या बैठकीत नमूद केले.

विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमात पक्षांचा सक्रीय सहभाग व भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रस्तरीय राजकीय पक्षाचे एजंट (बीएलए) Booth Level Agent नियुक्त करून या कार्यक्रमात प्रशासनास सहकार्य करावे तसेच मतदारांशी संपर्क वाढवावा असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या पुनर्निरीक्षण कार्यक्रमा दरम्यान मतदारां शी संपर्कात राहून त्यांना आवश्यक पुरावे सादर करण्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मदत करावी असे त्यांनी आवाहन केले.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपण जिल्ह्यातील संघटना बांधणी संदर्भात विशेष लक्ष देणार असल्याचे सांगत सरकार दरबारी पडलेली कामे सोडविण्यासाठी त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तासभर उशिराने पालघर मध्ये दाखल झालेले शिवसेनेचे दोनही नेत्यांनी ५० मिनिटांमध्ये सभा आटपुन परतीचा प्रवास रेल्वेने करण्याचे पसंद केले.

सातपाटी शिवसेना शाखेला टाळे

श्रीराम मंदिर ट्रस्ट उभारलेल्या गाड्यांमध्ये शिवसेनेचे शाखा कार्यालय कार्यरत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी गंभीर दखल घेऊन या बाबीची चौकशी करण्यास जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी सूचित केले. अशा कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून संबंधितांवरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येईल असे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नंतर कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.