पालघर : डोंबिवलीत नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून रुग्णालयातील डॉक्टर यांना मारहाण केल्याचे प्रकरण गेल्या दोन महिन्यापासून गाजत असताना पालघर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांच्या आप्तेष्टांकडून उपचारादरम्यान तपासणीचे पैसे मागितल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयात शिवागळ करत धुडगूस घातली. या प्रक्रियेत रुग्णालय फोडून टाकण्याची धमकी देण्या सह महिला डॉक्टरांना अर्वाच भाषेत जाब विचारण्यात आला असून एका कर्मचाऱ्याला शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने कानशिलात भडकवण्याचा प्रकार घडला. या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत, आमदार पुत्र रोहित गावित यांच्यासह १७ जणांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पालघर शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचे कार्यालय असून याच कार्यालयाच्या आवारात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यासाठी भव्य व्यासपीठ, रोशनाइ व संगीत व्यवस्था (डीजे) केली जात असून नागरिकांना बसण्यासाठी खास व्यवस्था (स्टॅन्ड) केली जात आहे. या व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह अनेक मान्यवरांनी या गोविंदा उत्सवा दरम्यान सहभाग नोंदविला होता.

शनिवारी सायंकाळी उशिराने या गोविंदा उत्सवाला आरंभ झाला. गोविंदा उत्सवात हंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पथकातील सहकार्यांना या शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाजूचा इमारतीत असणाऱ्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मध्यरात्रीपर्यंत छातीच्या दुखापतीसाठी दोन तर डोक्याला व मणक्याला मार लागणे तसेच खांद्याला दुखापत झाल्या प्रकरणात पाच रुग्णांना उपचार सुरू होते. आवश्यकतेनुसार काही रुग्णांचे सिटी स्कॅन इतर काहींचे एक्स-रे काढण्यात आले होते. डोक्याला व मणक्याला इजा असणाऱ्या रुग्णांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यासंदर्भात वैद्यकीय सल्ला देऊन त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. तसेच त्यांची आवश्यकतेनुसार रेडिओलॉजी तपासणी करण्यात येत होती.

दाखल केलेल्या काही गोविंदा पथकातील सदस्यांवर उपचारादरम्यान पथकातील अन्य सहकाऱ्यांकडून तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून तपासणी व उपचार करिता झालेल्या १९८६६ रुपयांच्या शुल्क बाबत मागणी करण्यात आली होती. मात्र गोविंदा पथकांनी बिलाची रक्कम शिवसेना जिल्हाप्रमुख देतील असे सांगितले होते. दरम्यान आयोजकांकडून १० हजार रुपयांचा भरा करण्यात आला होता.

पहाटे सव्वा वाजल्याच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत व अन्य शिवसैनिकांनी रुग्णालयात येऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सिटी स्कॅन का करण्यात आला याबाबत जाब विचारला. डोक्याला मार लागला असल्याने असं करणे आवश्यक असते उत्तर रुग्णालयातील स्वागत कक्षा जवळ कार्यरत असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रुग्णालय फोडण्याची धमकी दिली तसेच तसेच डॉक्टरांविषयी अर्वाच्य भाषेत वर्तन केले.

पाठवतात शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांनी एका कर्मचाऱ्यांच्या कानशीलात भडकवली. ही घटना रुग्णालयाच्या स्वागत कक्षामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. नंतर या शिवसेना पदाधिकारी व पाठीराखांनी अतिदक्षता विभागात जाऊन दाखल झालेल्या रुग्णांना सोडून देण्यास भाग पाडल्याचे हॉस्पिटल तर्फे दाखल तक्रार अर्जात उल्लेखित आहे. या प्रकरणात पालघर पोलीस स्टेशन मध्ये १७ शिवसेना पदाधिकारी व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची आली आहे.

या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्याशी संपर्क साधला असता गोविंदा पथकातील किरकोळ जखमी रुग्णांना सोडत नसल्याने हा वाद झाल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले. मध्यरात्री पूर्वी विरार येथील एका गोविंदा पथकातील जखमी सहकार्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी आपण १० हजार रुपयांचा रुग्णालयात भरणा केल्याची त्यांनी माहिती दिली. इतर काही पथकांमधील सहकार्यांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्याने रुग्णालयात चौकशी करण्यासाठी आपण गेलो असता किरकोळ वाद झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले. पालघर पोलीस ठाण्यात सकाळी दाखल तक्रारीत (एफआयआर) मध्ये खालील कायद्यांन्वये कलमे लावण्यात आली आहेत:

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३:
११५(२): दुखापत पोहोचवणे.
३५१(२) व ३५२: शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे व धमकावणे.
३२९(४): अनधिकृतपणे प्रवेश (गुन्हेगारी स्वरूपाचा).
१८९(१), १८९(२) व १९०: गैरकायद्याची मंडळी जमवणे व त्यातील सदस्यांचा सहभाग.

महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि संस्था अधिनियम, २०१०:
कलम ३ व ४: वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, हिंसक कृत्ये करणे आणि रुग्णालयातील मालमत्तेचे नुकसान करणे.