पालघर: पालघर शहरात प्रवेश करताना वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या रुंदीकरणाचे काम आता ५० टक्के पूर्ण झाले आहे. नगरपरिषदेमार्फत ७५ लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामामुळे चौकातील दोन प्रमुख बाजू मोकळ्या झाल्या असून, ‘फ्री लेफ्ट’ (डावीकडे सहज वळण) मिळाल्याने या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
मनोर येथून पालघर, माहीम व परिसरातील गावांमध्ये येणारी वाहने प्रामुख्याने रेल्वे उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि बोईसरकडे जाणाऱ्या मार्गावर शाळा, महाविद्यालये व आयटीआय असल्याने या चौकात दुपारच्या आणि सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असे. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या निधीतून नगरपरिषदेने युद्धपातळीवर रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते.
सध्या या चौकातील ५० टक्के काम पूर्ण झाले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या कोपऱ्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्यामुळे वाहनांना विनाअडथळा डावीकडे वळण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. पोलीस चौकीकडील भागाचे रुंदीकरण करण्यात आल्याने, स्टेशनकडे वळणाऱ्या वाहनांनाही ‘फ्री लेफ्ट’ मिळाला आहे. यामुळे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांची गती कायम राहून चौकातील ताण कमी झाला आहे.
हे काम करताना रस्त्याची सव्वा तीन ते पाच मीटरपर्यंत रुंदी वाढवण्यात आली असून, जुनी सिग्नल यंत्रणा हटवून माती-मुरूम भरणे व डांबरीकरणाचे काम पूर्ण कर
ण्यात आले आहे. या परिसरातील वृक्षांचे योग्य पद्धतींने पुनर्रोपण व छाटणी करण्यात आली होती.चौकाच्या ५० टक्के भागाचा कायापालट झाला असला, तरी उर्वरित दोन कॉर्नरचे काम अद्याप प्रलंबित आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या कोपऱ्याचे रुंदीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून बोईसरकडे जाणाऱ्या बाजूच्या कॉर्नरचे रुंदीकरण बाकी आहे. पुढील काही दिवसांत हे उर्वरित काम देखील पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर हा संपूर्ण चौक वाहनचालकांसाठी पूर्णपणे मोकळा श्वास घेईल.
