पालघर : दहीहंडी उत्सवानंतर पालघर मधील एका खाजगी रुग्णालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घातलेल्या धुडगूस प्रकरणात २३ संशयित आरोपी अटकेत असून यापैकी पालघर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सहा संशयित आरोपींतर्फे दाखल केलेल्या जामीन अर्ज निकाली काढण्यात आला. दहीहंडीनंतर जखमी गोविंदांना सोडण्यावरून झालेला वादविवाद, रुग्णालय फोडण्याची धमकावली व त्यानंतर झालेली मारहाण या प्रकरणात पालघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये १२ गोविंदा पथकाच्या सहकाऱ्यांसह एकूण २३ संशयित आरोपींना पोलीस आली अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणात आमदार राजेंद्र गावित यांची चिरंजीव रोहित गावित, वृषभ वारे, मनीष संखे, साईराज पाटील, राहुल संखे व नीलम संखे यांच्यातर्फे पालघरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जामिनासाठी अर्ज करण्यात आले होते. या अर्जावर २३ सप्टेंबर रोजी सुमारे साडेतीन तास व २४ सप्टेंबर सुमारे अडीच तास दोन्ही पक्षांच्या वकिलाने युक्तिवाद केला.

जामिनासाठी अर्ज करणाऱ्या संशयित आरोपींच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी कोणत्याही प्रकारची नासधूस या अर्जदारांकडून झाली नसल्याचे तसेच त्यांच्या प्रत्यक्षात गुन्ह्यामध्ये सहभाग नसल्या संदर्भात बाजू मांडताना ही मंडळी केवळ प्रेक्षक म्हणून उपस्थित असल्याचे व त्यांनी अतिदक्षता विभागात प्रवेश घेतला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पालघर न्यायालयात झालेला या युक्तिवाद दरम्यान बेकायदेशीर जमाव, उद्देश या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली.

सरकारी पक्षातर्फे पोलिसांनी लावलेली कलम योग्य असल्याबद्दल बाजू मांडताना उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देण्यात आला. तर त्याविरुद्ध आरोपींच्या वकिलाने याविषयी तांत्रिक युक्तिवाद करताना अनेक वरिष्ठ न्यायालयाच्या निकालांचे दाखले दिले. यासंदर्भात पालघरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी दोन्ही बाजू ऐकून यासंदर्भात सोमवारी निकाल देणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांनी निर्णय देण्यासाठी आणखी एक दिवसाचा वेळ घेतला. आज सायंकाळी त्यांनी हे सर्व जमीन अर्ज फेटाळले.