पालघर : सर्पदंशच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंश लस (अँटी स्नेक वेनम – ASV) इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असून अशा रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका सेवाही सतर्क ठेवण्यात आली आहे. नाग किंवा फोडस सापाचा दंश झाल्यास अशा गंभीर रुग्णांना संदर्भीय सेवा देण्यासाठी पालघर व बोईसर येथील रुग्णालयांशी संलग्नता करण्यात आली आहे.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागाने संपूर्ण जिल्ह्यात विशेष तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अँटी स्नेक व्हेनम (ASV) इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

सर्पदंशाच्या रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांना विलंब न करता उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत दाखल करण्यासाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा तसेच इतर शासकीय रुग्णवाहिका २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या असून त्या स्वच्छ, सुसज्ज आणि तत्पर स्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार, झाडफूक, मांत्रिक किंवा अंधश्रद्धेचा अवलंब न करता रुग्णाला तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत दाखल करावे. सर्पदंशानंतर वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार आणि अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन मिळाल्यास मृत्यू तसेच गंभीर गुंतागुंत टाळणे शक्य होते.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या संभाव्य घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ १०८ रुग्णवाहिका सेवा किंवा जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नाग व फोडस दंश रुग्णांकडे विशेष लक्ष

नाग व फोडस सापांचा दंश झालेल्या रुग्णांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम होत असून अशावेळी या रुग्णांना प्राणवायूचा आधार मिळण्यासाठी व्हेंटिलेटर किंवा तत्सव व्यवस्थेची गरज भासत असते. याकरिता पालघर येथील ढवळे रुग्णालय तसेच बोईसर येथील वरद हॉस्पिटलशी आरोग्य विभागाने संदर्भीय सेवेसाठी करार केला असून त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. कोणत्याही सर्पदंश रुग्णाला अशा संदर्भीय सेवा देण्यापूर्वी आवश्यकता भासल्यास किमान १० सर्पदंश लस देऊन पुढील उपचारासाठी पाठवावे अशा सूचना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून यामुळे सर्पदंश मुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

शेतीच्या कामादरम्यान काळजी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला भात शेतीच्या कामाने वेग घेतला असून याच काळात सापाच्या बिळात पाणी शिरल्याने ते बाहेर पडतात आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपर्कात येतात. मागील काही वर्षाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात दररोज सहा ते सात सर्पदंशाच्या घटनांची नोंद होते. एप्रिल २०२४ ते २०२५ या कालावधीत जिल्ह्यात २५१९ जणांना सर्पदंश झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जव्हार आणि वाडा भागात सर्वाधिक रुग्ण आढळलले आहेत.

सर्पदंशादरम्यान घ्यावयाची काळजी

शेती काम करतांना गमबूटचा वापर करावा, घराच्या आणि शेताच्या आजूबाजूला असलेला कचरा आणि अडगड काढून टाका, साप चावल्यास घाबरून न जाता साप चावलेल्या जागेपासून थोड्या अंतरावर घट्ट पट्टी बांधा, गावठी उपचार करण्या ऐवजी तातडीने जवळच्या रुग्णालयात जा.