पालघर : मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरित मतदार, मृत मतदार, समान फोटो असणारे वेगवेगळे मतदार, अस्पष्ट फोटो असणाऱ्या मतदारांची नावे हटवून मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम – २०२४ (Special Intensive Revision SIR)’ राबविण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील जेमतेम ४२ टक्के मतदारांचे मॅपिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून नागरिकांनी या संदर्भात आपल्या मतदार यादीतील नोंदी संदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून खातरजमा करणे तसेच मॅपिंग झाली नसल्यास आवश्यक पुरावा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत सन २००२ मधील मतदार याद्या आणि सन २०२४ मधील अद्ययावत मतदार याद्यांची तुलनात्मक पडताळणी करून प्रत्येक मतदाराची ‘मॅपिंग’ प्रक्रिया करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या २४ लाख तीन हजार ४४३ मतदारांची या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमात पडताळणीसाठी पात्र झाले आहेत
मतदार सन २००२ च्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमा दरम्यान जे मतदार सन २००२ च्या यादीत होते व २०२४ च्या यादीतही आहेत, अशा मतदारांची थेट पडताळणी करून बीएलओ ॲप मधील विशेष टॅबमध्ये त्यांची माहिती नोंदवली जाणार आहे. अशा ४० ते १०० वयोगटातील ४८.१४ टक्के मतदार (६२७८४९) मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे नालासोपारा विधानसभा क्षेत्रात या मॅपिंगचे प्रमाण अवघे २०.५३ टक्के तर बोईसर विधानसभा क्षेत्रातील या वयोगटातील ४२.६९ टक्के मतदारांची मॅपिंग पूर्ण झाले आहे.
सध्या १८ ते ३९ वयोगटातील सद्यस्थितीत असणाऱ्या मतदारांची प्रोजणी मॅपिंग होणार आहे. सद्यस्थितीत असणाऱ्या मुलगा, मुलगी, नात, नातू अशा नव्या पिढीतील मतदारांची आई-वडील, आजोबा-आजी यांच्याशी रक्तसंबंधाच्या आधारे जोडणी करण्यात येणार आहे. यामुळे वंशावळीवर आधारित नैसर्गिक मतदार साखळी तयार होणार आहे. पालघर जिल्ह्यात ३५.६१ टक्के मतदारांचे प्रोजणी मॅपिंग पूर्ण झाले असून जिल्ह्यात एकंदर ४२.४१ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.
सन २००२ च्या मतदार यादीत नाव नसलेले, मात्र २०२४ मध्ये नव्याने समाविष्ट झालेले मतदारांची सेल्फ प्रोजणी (Self Progeny) म्हणून मॅपिंग केली जाणार आहे. यामध्ये विशेषतः बाहेर गावाहून विवाहानंतर आलेल्या महिला (सून/पत्नी), स्थलांतरित मतदार, नव्याने नोंदणीकृत नागरिक यांची मूळ विधानसभा मतदारसंघातील माहिती घेऊन किंवा त्यांच्या आई-वडील/आजोबा-आजी यांच्या आधारावर मॅपिंग करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी मूळ विधानसभा मतदारसंघातील तपशील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक पुरावे सादर करणे अपेक्षित आहे.
पालघर लोकसभा क्षेत्रात विक्रमगड विधानसभा क्षेत्रात ७८ टक्के मॅपिंग झाले असून, डहाणू विधानसभा क्षेत्रात ७१ टक्के, पालघर विधानसभा क्षेत्रात ६७ टक्के, वसई विधानसभा क्षेत्रात ३४ टक्के, बोईसर विधानसभा क्षेत्र ३१ टक्के तर नालासोपारा विधानसभा क्षेत्रात अवघे १२.३५ टक्के मॅपिंग झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
संदर्भ नसलेल्या मतदारांसाठी १३ पुरावे बंधनकारक
ज्या मतदारांचे स्वतःचे नाव अथवा त्यांच्या आई-वडील वा आजोबा-आजी यांचे नाव उपलब्ध नाही अशा संशयास्पद मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने १३ वैध पुरावे संबंधित बीएलओ यांना अथवा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे अनिवार्य केले आहेत. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जमीन-घर वाटप प्रमाणपत्र, जुने सरकारी ओळखपत्र, पेन्शन ऑर्डर, कुटुंब नोंदणी पत्र इत्यादींचा समावेश आहे. संशयास्पद किंवा अपूर्ण कागदपत्र असलेल्या मतदारांची संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष सुनावणी घेऊन निर्णय केला जाणार आहे.
मतदारांची भूमिका
विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम – २०२४ नुसार मतदार आपले स्वतःचे नाव २००२ च्या यादीत समाविष्ट होते याबाबतची खात्री
https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDF-JK4QWODSE
या मतदार सर्विस पोर्टल (voter service portal) या भारत निवडणूक आयोगाच्या साईटवर करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ BLO) यांना आपले नाव मॅपिंग करण्याबाबत सहकार्य करू शकतो तसेच स्वतःचे २००२ चे मतदार यादीतील नाव शोधल्यानंतर आपल्या मुलगा, मुलगी, नात, नातू अशा प्रोजणी मॅपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय पक्षांचा सक्रीय सहभाग आवश्यक
या व्यापक पुनर्निरीक्षण मोहिमेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक पक्षाने जास्तीत जास्त मतदान केंद्रस्तरीय राजकीय पक्षाचे एजंट (बीएलए) Booth Level Agent नियुक्त करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. बीएलए यांच्या माध्यमातून गावपातळीवर अचूक माहिती संकलन, चुकीच्या नोंदींचे निदान व मतदारांना मार्गदर्शन मिळणार असल्याने हा कार्यक्रम अधिक परिणामकारक ठरणार आहे. या संदर्भात पालघरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यादी शुद्धिकरणाचा ऐतिहासिक टप्पा
विशेष सखोल पुनर्निरीक्षणामुळे बनावट मतदारांना आळा बसेल, दुबार नोंदी हटवल्या जातील, मतदार यादी विश्वासार्ह हाईल, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदार यादीची शुद्धता अबाधित राखणे हे केवळ प्रशासनाचेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, असे मत जिल्हाधिकारी व जिल्हानिवडणूक अधिकारी पालघर यांनी व्यक्त केले आहे आहे.
बातमी जिल्हा निवडणूक विभागाच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये आवश्यक आकडेवारी करून अंतर्भूत करून तयार करण्यात आली आहे
