महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी इयत्ता दहावीची मुख्य परीक्षा आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील ६४ हजार १६६ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा पारदर्शक, निर्भय आणि पूर्णतः ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलीस विभागाने सर्वंकष तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण ६३२ शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि परीक्षेच्या सुयोग्य नियोजनासाठी जिल्ह्यात १२६ मुख्य परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी जिल्ह्यात १३ परिरक्षण केंद्रे (कस्टडी) तैनात करण्यात आली आहेत. परीक्षेच्या कामकाजासाठी एकूण २५६७ वर्गखोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून, तितकेच पर्यवेक्षक प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर आणि भरारी पथके
यंदा कॉपी बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत, कारण प्रशासनाने परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण १२६ केंद्रांपैकी ९५ केंद्रांवर १०० टक्के सीसीटीव्ही कव्हरेज देण्यात आले आहे. ज्या ३१ केंद्रांवर वर्गांमध्ये कॅमेरे नाहीत, तिथे किमान केंद्राच्या मुख्य गेटवर आणि वराड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर ५ बैठी पथके आणि ७ विशेष भरारी पथके अचानक भेटी देणार आहेत. यामुळे परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर सूक्ष्म लक्ष राहणार आहे.
पोलीस प्रशासनाचे कडक निर्बंध
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा बेकायदेशीर जमाव जमवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या क्षेत्रातील झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स आणि एसटीडी बूथ परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, परीक्षार्थींना आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन किंवा स्मार्ट वॉच वापरण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
पालक आणि विद्यार्थ्यांना प्रशासनाचे आवाहन
पहिल्या पेपरच्या आधी विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या काही प्रमाणात तणाव दिसून येतो. हा तणाव दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना धीर दिला आहे. “विद्यार्थ्यांनी परीक्षेला घाबरून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जावे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि शांत मन ठेवून पेपर लिहावा. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्या,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या नियोजनबद्ध तयारीमुळे पालघर जिल्ह्यात दहावीची परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
