पालघर : पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, जिल्हा परिषदेने यावर तातडीने कारवाई केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवासाची व शिक्षणाची तात्पुरती व्यवस्था केली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास थांबला असून त्यांच्या शिक्षणात सातत्य राखले जाणार आहे.

विक्रमगड तालुक्यातील म्हसेपाडा येथील विद्यार्थी पिंजाळ नदी ओलांडून वाकी व मलवाडा येथील शाळांमध्ये जात असल्याची माहिती २९ जून रोजी माध्यमांतून समोर आली होती. ही मुले टायरच्या ट्यूबचा वापर करून जीव धोक्यात घालत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांच्या पथकाने ३० जून रोजी वाकी शाळा व पिंजाळ नदी परिसरात भेट दिली. पाहणीत म्हसेपाडा येथून १५ विद्यार्थी वाकी शाळेत येत असल्याचे निष्पन्न झाले.

यावर उपाय म्हणून, म्हसेपाडा येथे इयत्ता चौथीपर्यंत शाळा असतानाही काही मुले बाहेरच्या शाळांमध्ये जात असल्याने, त्या १५ विद्यार्थ्यांना शिक्षण हमी योजनेअंतर्गत म्हसेपाडा शाळेत तात्पुरता प्रवेश देण्यात आला. तसेच इयत्ता सहावी सातवीतील चार मुलांसाठी शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

मलवाडा येथील स्वजन विद्यालयात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांची राहण्याची व्यवस्था वाकी येथील नातेवाईकांकडे करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या समुपदेशनामुळे पालकांनी या निर्णयाला सहकार्य केले आहे.

वाडा तालुक्यातील नाकाडपाडा आणि झुगरेपाडा येथील विद्यार्थ्यांना गारगाव शाळेत जाण्यासाठी गारगाई नदीवरील बंधाऱ्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ३ जुलै रोजी ही बाब माध्यमांतून समोर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी वैभव शिंदे आणि गटशिक्षणाधिकारी उमेश सातपुते यांनी घटनास्थळी पाहणी केली.

नाकाडपाडा आणि झुगरेपाडा येथील २५ विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने सर्व विद्यार्थ्यांना गारगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत तात्पुरती राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची कार्यवाही सुरू असून, यामुळे विद्यार्थ्यांचा दररोजचा धोका टळणार आहे.

वाडा तालुक्यातील मौजे रायकरपाडा येथील विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे आणि जिल्हा परिषद शाळा कापरी येथे शिक्षणासाठी दररोज पाण्यातून प्रवास करत होते. नदी व ओढ्यांतून होणारा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी धोकादायक होता. ही माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तातडीने चौकशी व उपाययोजनेचे आदेश दिले.

या आदेशानुसार गटविकास अधिकारी वैभव शिंदे आणि गटशिक्षणाधिकारी उमेश सातपुते यांनी न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाहणीअंती रायकरपाडा येथील १४ विद्यार्थ्यांपैकी ७ मुलांना संत रोहिदास मुलांचे वसतिगृह, सोनाळे येथे आणि ७ मुलींना शासकीय आश्रमशाळा, कळंबे येथे राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पालकांच्या संमतीनंतर प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास थांबला असून, त्यांना सुरक्षितपणे शिक्षण घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.