यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात विक्रमी पाऊस नोंदविला गेला. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तसेच २२ ते २४ जुलै दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रत्येक प्रसंगी वेगवेगळ्या तालुक्यांना त्याची झळ बसली. मात्र सूर्या नदी मधून पाण्याचा विसर्ग करणे भाग पडल्याने तसेच पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नदीकिनारी पूरर्जन्य परिस्थिती निर्माण झाली. वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या अति मुसळधार पावसावर नियंत्रण ठेवणे शक्य नसले तरीही नदी किनारी असणाऱ्या गावांना संरक्षण देणे शासनाच्या कर्तव्याच्या कार्यक्षेत्रात असून त्या दृष्टीने उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.

पालघर जिल्ह्यातून प्रामुख्याने सूर्या, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे या नद्या वाहत असून जिल्ह्याच्या पूर्वेकडील पट्ट्यात मोडक सागर, तानसा व मध्य वैतरणा असे बंधारे आहेत. सूर्या नदीवर धामणी व कवडास उन्नेयी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. याखेरीस वांद्री व कुर्झे येथील बंधारे तसेच काही लघुपाटबंधारे यांचा समावेश आहे. या बंधार्‍यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यास बंधाऱ्या मधून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येत असतो. तरी देखील गावांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे व मालमत्तेचे नुकसान होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.

जिल्ह्यामधून वाहणाऱ्या सूर्या नदीची लांबी ४५ ते ४८ किलोमीटर इतकी असून धामणी बंधार्‍याच्या पाणलोट क्षेत्र हे जव्हार तालुक्यातील डोंगराळ प्रदेश येत आहे. मात्र कवडास येथील धरणामध्ये धामणी धरणातून होणाऱ्या पाण्याचा नियंत्रित विसर्ग तसेच गंभीरगड व विक्रमगड तालुक्यातील सारसी परिसरातून वाहणाऱ्या ओढ्यांमधील पाणी मिसळत असल्याने या धरणामधील पाण्याचा विसर्ग धामणी पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की परिसरातील गावांमध्ये सातारकेतेची सूचना दिली जात असली तरी सद्यस्थितीत अलार्म यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित नाही. तर कवडास येथून पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नसल्याने पडणाऱ्या पावसाच्या अनुरुप नदीची पातळी अचानकपणे वाढण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून नुकसान होण्याचे प्रकार घडत असतात. कवडास धरणावर दरवाजे बसवण्याचे प्रस्तावित असून हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास काही प्रमाणात नदीकाठच्या गावांना दिलासा मिळणे शक्य होणार आहे.

मुसळधार पावसाच्या वेळी उन्मळून पडणाऱ्या झाडांमुळे किंवा झाडाच्या फांद्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. अशाप्रसंगी वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क बंद पडल्याने ग्रामीण भागातील नागरिक हे वीजप्रवाह तसेच मोबाईल नेटवर्क पासून वंचित राहतात. यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या तसेच नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधानतेची सूचना पोहोचवणे सहज शक्य होत नाही. अंधाराच्या वेळी नदीची पातळी अचानकपणे वाढल्यास मदतकार्य पोहोचविण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अथवा पाण्याच्या प्रवाहात मनुष्यहानी अथवा जनावरण वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध मोबाईल कंपन्यांनी एकमेकांशी विशिष्ट प्रकारे संलग्नता करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असले तरीही त्यावर सहजपणे तोडगा निघेल अशी शक्यता दिसून येत नाही.

सूर्या नदीच्या प्रवाहा दरम्यान चिंचारे गावाच्या परिसरात नदी नागमोडी पद्धतीने प्रवाहित असून इंग्रजी “एस” शब्दाप्रमाणे नदीचा प्रवाह या ठिकाणी वाहतो. नदीच्या प्रवाहात अचानक होणाऱ्या बदलामुळे चिंचारे सह बोरशेती व रावते गावांमध्ये अनेकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. खोलगट असणाऱ्या नदीकिनारी गावांमध्ये नदीच्या उच्चतम पूर पातळी (हायेस्ट फ्लड लेवल) चा अभ्यास करून अशा गावांमध्ये नदीकाठी संरक्षण भिंती उभारणे प्रस्तावित असले तरीही या कामासाठी अजूनही निधीची मंजुरी प्राप्त होणे प्रलंबित आहे. याच बरोबरीने नदीमध्ये अनेक ठिकाणी गाळ साचला असून नदीचे पात्र गाळमुक्त केल्यास नदीमधून वाहणाऱ्या पाण्याची मात्रा वाढण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने पूर नियंत्रणासाठी एकात्मिक आराखडा तयार करण्याची घोषणा केली असली तरी या परिसराचा अभ्यास करणे व त्या अनुषंगाने उपाययोजना आखण्यासाठी अवधी लागण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान विकसित होत असताना नदीकाठच्या गावांमध्ये अलार्म सिस्टम कार्यान्वित करण्यासाठी झालेला विलंब हा शासकीय व्यवस्थेतील उदासनशीलतेचे प्रतीक आहे.

अतिमुसळधार किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यास पाण्याचा वाहून येणाऱ्या लोंढ्याला समुद्रातील भरतीच्या पाण्याचा अडथळा निर्माण होत असतो. शिवाय जिल्ह्यातील अनेक नाल्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण व परिणामी बुजले गेलेले अथवा अरुंद झालेल्या नाल्यांमुळे पाण्याच्या निचरा होण्यामध्ये देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन संबंधिताविरुद्ध कारवाई करणे देखील गरजेचे झाले आहे. अचानक येणाऱ्या पुरामध्ये व्यापारी समुदायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. व्यापारी मंडळींना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली जात असली तरीही अशा व्यापाऱ्यांना पूर विमा काढण्यासाठी विशेष योजना बनवणे तसेच असे विमा काढून घेण्यास त्यांना प्रवृत्त करणे देखील आवश्यक झाले आहे.

जागतिक तापमान वाढ, त्यामुळे उद्भवणारे परिणाम तसेच यंदा एल निनो मुळे उद्भवलेल्या विशिष्ट परिस्थितीमुळे असाधारण पाऊस झाल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. विविध राष्ट्रीय प्रकल्पांसाठी होणारी वृक्षतोड व त्यामुळे जिल्ह्यात वाढलेले भूस्खलनाचे प्रकार हे देखील आगामी काळात पुरा इतकेच गंभीर मानले गेले पाहिजेत. या सर्वांवर एकत्रित अभ्यास करून उपाययोजना आकडे आवश्यक झाले आहे.