पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, सांडपाणी तसेच घातक रासायनिक घनकचरा टँकरद्वारे वाहतूक केला जात असल्याने तारापूर एमआयडीसी मधील टँकरची वाहतूक सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान प्रतिबंधित करणाऱ्या आदेशाला जिल्हाधिकारी यांनी जून अखेरीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गेल्या सहा महिन्यात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन टँकर विरुद्ध कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तारापूर येथील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता २५ घनमीटर प्रतिदिन इतकी मर्यादित असल्याने राष्ट्रीय हरित लवाद व न्यायालयाच्या सूचनेनुसार एमआयडीसी कडून पाणीपुरवठ्यावर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. काही उद्योजक टँकर मधून पाणीपुरवठा घेत असल्याचे निदर्शनास आल्याने व त्यामुळे सांडपाण्याची प्रमाण वाढत असल्याने पाण्याच्या टँकरची रात्रीची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तारापूर येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नवापूर जवळील समुद्रात ७.१० किमी खोलवर सोडण्यात येत असले तरी घातक रासायनिक अवशेष असणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे महागडे ठरत असल्याने काही उद्योजक हे सांडपाण्याच्या टँकर मधून असे घातक रसायनिक सांडपाणी उघड्यावर अथवा शेतजमिनी, नाल्यांमध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आले होते.
या दोन्ही कारणांमुळे प्रक्रिया क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात सांडपाणी निर्मित होणे, सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया केली न जाणे व त्यामुळे व नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याने अखिल भारतीय मांगेला समाजाने राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये उच्चस्तरीय बैठक घेऊन टँकर वरून अवैद्यरित्या पाणी अथवा रासायनिक सांडपाणी अंधाराच्या वेळी प्रतिबंधित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. तेव्हा पासून नियमित कालावधीसाठी एमआयडीसी मधील सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेदरम्यान टँकर वाहतूक निर्बंधित करणारी आदेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केले जात आहेत. या आदेशाचे नूतनीकरण ४ मे रोजी करण्यात आली असून या आदेशाला १ जुलै पर्यंत लागू केले गेले असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने दिले गेले आहे.
तारापूर एमआयडीसी मधील रात्रीच्या वेळच्या टँकर बंदीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असून पोलिसांचे पथक तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये कार्यरत असून गेल्या सहा महिन्यात तीन टँकर विरुद कारवाई केल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी लोकसत्ता ला दिली.
दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाशी संपर्क साधला असता काही विशिष्ट उद्योगांमधील सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अथवा सीओडी अधिक मात्रा असणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये वाहतूक करण्याचे काम फक्त दिवसा केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळा च्या तारापूर कार्यालयात मनुष्यबळाची मर्यादा असून तरीदेखील तक्रारी प्राप्त झाल्यास रात्रीच्या वेळी संबंधित ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत भेट दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
एमआयडीसी कडे पावसाचे पाणी गोळा करण्याची तसेच उद्योगांमधील सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) मध्ये नेण्याची व्यवस्था कार्यान्वित असून एमआयडीसीची जलवाहिनी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या चेंबर मधून अनेकदा सांडपाणी बाहेर ओसंडून वाहताना दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नाले व गटार व्यवस्थेची सफाई होते त्याप्रमाणे सांडपाणी वाहन व्यवस्थेची सफाई करून घ्यावी अशी मागणी पुढे येत आहे.
