पालघर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये तसेच परिसरात एका उद्योग समूहाच्या मदतीने सुमारे दोन लाख पेक्षा अधिक झाडांची लागवड मियावाकी पद्धतीने करण्यात आली होती. औद्योगिक वसाहती मधील पहिले कृत्रिम जंगल मोठे व बहरदार झाले असून तारापूर व परिसरात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत, कृत्रिम हरित आवरण निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थानिक प्रजातींची लागवड केली जात आहे. हे वृक्ष परिपक्व होईपर्यंत एका विशिष्ट कालावधीसाठी त्यांचे संगोपन व निगा राखली जात असून त्यानंतर कीटक, पक्षी व प्राणी यांच्या नैसर्गिक भरभराटीस पोषक ठरेल असे वातावरण निर्माण केले जात आहे.

दाट पद्धतीने वृक्ष लागवड केल्यास सर्व झाडांची वाढ झटपट होऊन त्यामुळे घनदाट जंगलाप्रमाणे कृत्रिम जंगल अल्पवधीत तयार होते असे मियावाकी पद्धतीच्या वृक्ष लागवडीने सिद्ध केल्याने सन २०१६ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश ढाकणे यांच्या पुढारकाने तारापूर औद्योगिक वसाहती मधील ई- झोनमधील ओएस- २० मध्ये २५ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. अवघ्या दोन अडीच वर्षात या झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्यामध्ये जैवविविधता अस्तित्वात असल्याचे दिसून आले.

या प्रकल्पाचे यश पाहून एमआयडीसी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन एमआयडीसी मधील एक हजार एकर जागा मियावाकी कृत्रिम वन उभारणीसाठी देण्यास मंजुरी दिली त्यानंतर तारापूर औद्योगिक वसाहती मधील काही उद्योग समूहाने तसेच एमआयडीसीच्या मोकळ्या जागांवर अशाच प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली. सद्यस्थितीत औद्योगिक वसाहत परिसरात अशा ११ कृत्रिम वनामध्ये ८० हजार पेक्षा अधिक झाड उभी आहेत.

गेल्या वर्षी बोईसर तारापूर लगत असणाऱ्या नवापूर गावच्या किनाऱ्यावर आर. के नायर यांच्या फॉरेस्ट क्रियेटर्स संस्थेच्या पुढाकाराने व एचडीएफसी बँकेच्या अर्थसहाय्याने १.१४ लक्ष वृक्ष लागवड एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संशीधरण जगदीशन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या मियावाकी कृत्रिम वनाची देखभाल ग्रामपंचायत व सेवाभावी संस्था करत असून बोईसरच्या सागरी किनाऱ्यावर गुजरात मधील नारगोळ प्रमाणेच भव्य कृत्रिम वनक्षेत्र निर्माण होईल अशी आशा आहे.

वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांच्या पुढारकाने तसेच वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पालघर तालुक्यातील टेन या गावातील उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानात स्थानीय प्रजातीची ५५०० वृक्षरोपण करण्यात आले आहे. याच बरोबर आहे नांदगाव, आलेवाडी गावांच्या दरम्यान एका १७ एकर भूखंडावर कृत्रिम वन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून यासाठी आवश्यक परवानगी घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पाल फॅशन्सचा पुढाकार

तारापूर एमआयडीसी क्षेत्रामध्ये मियावाकी पद्धतीने कृत्रिम वन उभारण्यासाठी तारापूर येथील वस्त्रोद्योग क्षेत्रातील पाल फॅशन्स या उद्योग समूहाचे चरण अहुजा यांनी सेवाभावी वृत्तीने पुढाकार घेतला असून या कामी तसेच राज्यात इतर अनेक ठिकाणी सामाजिक दाईत्व निधीमधून कृत्रिम वन उभारण्यासाठी प्रकल्प हाती घेतले आहेत. तारापूर येथील कृत्रिम हरित प्रत्येक निर्माण करताना स्थानिक प्रजातींची लागवड करणे, ठराविक वर्षांसाठी ही झाडे मोठे होईपर्यंत त्यांचे संगोपन व देखभाल करणे व नंतर त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने जीव, जंतू, पक्षी व जनावर नांदण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे काम केले जात आहे. या सर्व प्रकल्पात मियावाकी कृत्रिम वनाचे जनक आर.के नायर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे.