पालघर : खाजगी वाहनात, रेल्वे गाडीत प्रवास करण्याची संधी न मिळालेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांमधील २०० विद्यार्थ्यांनी हवाई सफर करत बेंगळुरू व परिसरात असणाऱ्या शैक्षणिक स्थळांना भेट दिली. दुर्गम गावातुन आलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या जव्हार प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला शैक्षणिक दौरा अत्यंत प्रेरणादायी व ऐतिहासिक ठरला.
जव्हार प्रकल्पांतर्गत एकूण ३० शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून त्यापैकी जव्हार व विक्रमगड तालुक्यातील १७ शाळांमधून इयत्ता नववी व अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड या दौऱ्यासाठी करण्यात आली होती. हा दौरा दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता.
२४ मार्च रोजी १०० मुलांचा व २८ मार्च रोजी १०० मुलींचा दौरा अत्यंत नियोजनबद्ध रितीने पार पडला. दुर्गम वाड्या-पाड्यातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव देण्यात आला. अनेक ठिकाणी अजूनही मूलभूत सुविधा मर्यादित असताना, या विद्यार्थ्यांनी थेट आकाशात झेप घेतल्याचा हा क्षण अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद ठरला. मुंबई विमानतळावरून बेंगळुरूकडे प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि नव्या जगाची ओळख होत असल्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.
बेंगळुरू येथे विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये एअरफोर्स स्टेशन, बेंगळुरू येथील भेट विशेष आकर्षण ठरली. येथे विद्यार्थ्यांना MI-17 हेलिकॉप्टर तसेच AN-32 विमान जवळून पाहण्याची संधी मिळाली. रडार सिस्टमची कार्यपद्धती, विमानातील उपकरणे आणि अंतर्गत रचना यांची सखोल माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विमानात बसून त्याचा अनुभव घेता आला. एअर फोर्स अधिकाऱ्यांनी विमानाची टेकऑफ व लँडिंग प्रक्रिया कशी होते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बेंगळुरू येथील प्रसिद्ध विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय येथे भेट देत विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक विविध प्रयोग अनुभवले व पृथ्वीवरील भौगोलिक बदलांविषयी माहिती घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी परतीच्या प्रवासात “उद्यान एक्सप्रेस” ने रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला. रेल्वे स्थानकावर गाडी येताच विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विमानानंतर रेल्वेचा हा अनुभवही विद्यार्थ्यांसाठी तितकाच संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात व्यापक बदल घडवून आणणे आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करणे हे या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या दौऱ्यातील विद्यार्थी जयेश अंधेर याचा अनुभव विशेष लक्षवेधी ठरला. जयेश म्हणाला, “आम्ही दुर्गम भागातून येऊन पहिल्यांदाच विमानात बसलो, हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. एअरफोर्स स्टेशनला जाऊन MI-17 हेलिकॉप्टर आणि AN-32 विमान पाहिलं, रडार सिस्टम समजली आणि विमानात बसून सर्व माहिती मिळाली. टेकऑफ आणि लँडिंगबद्दल ऐकताना खूप अभिमान वाटला. उद्यान एक्सप्रेसने केलेला प्रवासही तितकाच मजेदार होता. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील.” विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे मनःपूर्वक आभार मानले. “त्यांच्यामुळेच आम्हाला ही अनोखी संधी मिळाली असून आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत,” अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नवीन संधी, व्यापक दृष्टीकोन आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. – डॉ. अपूर्वा बासुर, प्रकल्प अधिकारी, जव्हार
