पालघर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः आदिवासी व आश्रमशाळांतील मुलांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी नैसर्गिक प्रतिभा मोठ्या प्रमाणात असून, त्या प्रतिभेला योग्य वेळी ओळखून आवश्यक प्रशिक्षण, पोषण, आर्थिक पाठबळ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना जिल्हा प्रशासनाने बनवली असून उच्च दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा शिक्षकांचा सहभाग व सुधारणा करण्यासाठी सूचना महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण व आर्थिक नियोजनासंदर्भात आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशामागे खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि संपूर्ण व्यवस्थेचे सातत्यपूर्ण प्रयत्न व त्याग असतो. केवळ प्रतिभा असून चालत नाही, तर त्यासाठी प्रशिक्षण, आहार, प्रवास आणि इतर आवश्यक बाबींमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते. विकसित भारताच्या संकल्पनेत देशाची ऑलिम्पिकमधील कामगिरी उंचावण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंना आर्थिक सहाय्य वाढविण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. या दृष्टीने जेएसडब्ल्यू च्या विशेष क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण बनवण्यासाठी योजना तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
विणव्हळ आश्रमशाळेत सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून या शाळेचे पुढील वर्षी क्रीडा शाळा (Sports School) म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त करत, उत्कृष्ट खेळाडूंना एकत्र आणून त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धांमध्ये निवड प्रक्रिया व सर्व निर्णय पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत, सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य दिशा आणि सर्वांच्या सहभागातूनच विकसित महाराष्ट्र व विकसित भारताचे क्रीडा क्षेत्रातील उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध स्पर्धांच्या ठिकाणी पक्षपाती पणा होणार नाही व खेळाडूंना व विशेषत चेंजिंग रूम चा दर्जा राखला जाण्याबाबत सर्व क्रीडा शिक्षकांनी जातीने लक्ष द्यायला हवे असे त्यांनी प्रतिपादन केले.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः पालघर, गडचिरोली, रत्नागिरी यांसारख्या जिल्ह्यांतील आदिवासी मुलांमध्ये उत्कृष्ट क्रीडा कौशल्य असल्याचे अनुभवातून दिसून आले आहे. या विद्यार्थ्यांची योग्य निवड करून त्यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणे आवश्यक असून, आश्रमशाळा, जिल्हा परिषद, अनुदानित आणि खासगी शाळांनीही समान सहभागातून ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील क्रीडा संकुल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, क्रीडा क्षेत्रातील सुधारणा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी शिक्षक व संबंधितांकडून सूचना मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या जिल्ह्यातील ३३०० शाळांमधून ७०० ते ७५० शाळांचा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग होत असला, तरी हा सहभाग पुढील काळात किमान १,५०० शाळांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.
क्रीडा संस्कृती रुजविण्याची जबाबदारी केवळ क्रीडा शिक्षकांची नसून प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. क्रिकेट हाच एकमेव खेळ आहे, हा समज बदलण्याची गरज असून फुटबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स आणि इतर विविध क्रीडा प्रकारांमध्येही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोणत्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या खेळासाठी नैसर्गिक क्षमता आहे, याची ओळख करून त्यानुसार त्यांना प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू घडू शकतील, असा विश्वासही मनोज रानडे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात निवासी प्रशिक्षण व्यवस्था व क्रीडा शाळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडूंना घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
