पालघर: ऑगस्ट २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्या मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, गुजरात व इतर पश्चिम विभागातील भाविकांना सोयीचे व्हावे या हेतूने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे आधी घेण्यात आलेले पालघर -त्र्यंबकेश्वर महामार्गाचे काम कुंभ मेळाव्यापूर्वी पूर्ण होण्याची प्रयत्न केले जात आहेत. त्याच बरोबरीने ११८७ कोटी रुपयांच्या अंदाजीत खर्चाचे काम अवघ्या ६२७ कोटींमध्ये करण्याची तयारी एका नामांकित ठेकेदाराने दर्शविल्याने आगामी काळात होणाऱ्या रस्त्याच्या पुनर्बांधणी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालय मार्फत सन २०१६ मध्ये घोषित झालेल्या पालघर – त्र्यंबकेश्वर- घोटी- सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण तसेच पुनर्बांधणीच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील ११७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ११८७.२१ कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत करण्यात आला होता. मोखाडा तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमा भागापासून (भांगदेव मंदिर) मनोर पर्यंत सात मीटर रुंदी तर मनोर ते पालघर दरम्यान १० मीटर रुंदीचा रस्ता व साईडपट्टी करण्याच्या दृष्टीने या कामाची आखणी करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर – नासिक येथे पुढील वर्षी सुरु होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात राज्याच्या पश्चिमेकडील भाविकांना सहभागी सुलभ होणे हे या रस्त्याच्या उभारणीभागी प्रथम कारण सांगितले जात होते. मात्र महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागांची उपलब्धता होण्यास वनविभाग व पेसा ग्रामपंचायत मधील तांत्रिक अडचणी दूर होण्यास विलंब झाल्याने रस्त्याचे काम अजूनही सुरू करण्यात आलेले नाही.
या कामाच्या संदर्भात संबंधित मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निविदेत काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा कालावधी ठरवून दिल्याने कुंभमेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांना हा मार्ग कितपत उपयुक्त या बद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. या महामार्गाच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीचे काम सुरू कुंभ मेळाव्याच्या दरम्यान सुरू राहिल्यास मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कॉंक्रिटीकरण करण्याच्या दरम्यान उद्धवलेली वाहतूक कोंडीची समस्या या पालघर – त्र्यंबकेश्वर मार्गावर देखील उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
४७ टक्के कमी दराने स्वीकारली निविदा !
पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या या पट्ट्यासाठी ११८७ कोटी रुपयांची अंदाजीत किंमत असताना २५ ठेकेदार कंपनीने निविदा भरल्या होत्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १८ ठेकेदार कंपन्याने निविदा किमतीपेक्षा कमी दराने काम मिळण्यासाठी अर्ज केले होते. दरम्यान आरआरएसएम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंदाजेत रकमेच्या ४७.१५ टक्के कमी दराने म्हणजेच ६२७.४८ कोटी रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शवल्याने होणाऱ्या कामाचा दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे या निविदेच्या अटी शर्ती मध्ये मर्यादित दोषदायित्व कालावधी नमूद केला गेल्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणानंतर रस्त्याची समान पातळी राखण्यास अपयश आल्याने वाहनांना कंपन बसण्याची समस्या निर्माण झाल्याप्रमाणे नव्याने उभारण्यात येणाऱ्या महामार्गावर समस्या निर्माण होणार नाही ना असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
या नव्याने बांधणी होणाऱ्या महामार्गा च्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले असले तरी महामार्गाच्या उभारणीस डोंगराळ व वळणदार रस्त्यांच्या ठिकाणी पर्यायी रस्ते उभारण्याची सुविधा नसल्याने तसेच अनेक ठिकाणी लगत वनविभागाची जमीन असल्याने काम करण्यात अनेक अडचणीचा सामना करावे लागले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होईल अशी देखील भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या रस्त्याच्या कामाचे निविदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आली असून सर्वात कमी विविध रक्कम भरणाऱ्या ठेकेदाराकडून या कामाचे स्वतंत्रपणे अंदाजपत्रक तयार करून घेण्याची काम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई – अहमदाबाद व मुंबई – आग्रा या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून नियोजित वेळेत व दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आव्हान संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर राहणार आहे.
या कामाच्या तपशिलाविषयी तसेच इतक्या कमी दरामध्ये काम करण्याची तयारी दर्शवणाऱ्या ठेकेदार कंपनी विषयी जिल्हा प्रशासनाकडे माहिती मागितली असता उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचा दर्जा पूर्णपणे राखण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रद्धा शेळके यांनी लोकसत्त्याला सांगितले. निविदा प्रक्रियेत कामासाठी सर्वात कमी खर्च दर्शवणाऱ्याचे ठेकेदाराचा निश्चिती झाली असून या महामार्गाच्या उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. एका महिन्याच्या नंतर या महामार्गाच्या पुनर उभारणीचे काम सुरू करण्यात येणार असून पावसाळ्यापूर्वी अधिक तर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे श्रद्धा शेळके यांनी पुढे सांगितले.
४७ टक्के कमी दराने काम कसे परवडू शकते?
– मुळात या कामाचा दोष दायित्व कालावधी हा १० वर्षांपासून आणल्याने सर्वसाधारणपणे तीन ते चार वर्षानंतर खराब होणाऱ्या डांबरी रस्त्याची विशेष देखभाल दुरुस्ती करावी लागणार नाही. या कामाचा दोषदायित्व कालावधी पाच वर्षांचे करिता निश्चित करण्यात आला आहे.
– सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामांमध्ये एका किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत केला जात असताना हा ठेका सव्वा पाच ते साडेपाच कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने स्वीकारला गेल्याने कार्यक्षम ठेकेदाराला हा दर परवडण्यासारखा आहे.
– अनेक ठेकेदार आणि काम करण्याची क्षमता गेल्या काही वर्षात काही पटीने वाढवली असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे ही यंत्रणा पडून राहण्याऐवजी किमान नफ्यामध्ये कार्यरत ठेवण्याची उद्दिष्ट काही ठेकेदाराने ठेवल्याचे सांगण्यात येते.
– अनेक बांधकाम कंपन्याने निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची क्षमता वाढवून आपल्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये आपली नोंदणी केले आहेत. त्या आधारे उभा केलेल्या निधीमधून स्पर्धात्मक घरामध्ये काम करण्याची तयारी काही ठेकेदार दर्शवताना दिसून आले आहे.
– अंदाजीत किंमत करताना फेब्रुवारी २०२६ मधील डांबर, सिमेंट, डिझेलचे दर विचाराधीन घेण्यात आले होते. गेल्या काही महिन्यात या कच्च्या मालाची किंमत काही पटीने वाढली असून दोन वर्षाच्या काम पूर्ण करण्याच्या कालावधी दरम्यान होणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढीच्या अनुषंगाने ठेक्याच्या किंमतीमध्ये त्या प्रमाणात वृद्धी होण्याची शक्यता आहे.
– ठेक्यामध्ये अंतर्भूत अति प्रत्यक्षात काम करताना कामाची व्याप्ती, घटनास्थळी करावयाची प्रक्रियेमध्ये बदल करून तसेच इतर आकस्मिकता कारणे दाखवून मंजूर निविदा किमतीमध्ये वाढ करून घेण्याची मुभा असल्याने अनेक ठेकेदाराला कमी दराने काम करणे परवडत असल्याची भूमिका मांडण्यात येत आहे.
महामार्गाच्या रस्त्याचा दर्जा राखणे आव्हानात्मक !
रस्त्याचे काम करताना अनेकदा ठेकेदाराकडून अनेक तांत्रिक कारणे व अडचणी पुढे करून कुमार दर्जाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रसंगी संबंधित शासकीय विभागांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने आवश्यक दर्जा राखला न केल्याचे कारण पुढे केले जाते. तर रस्त्याच्या उभारणी दरम्यान दर्जा राखण्यासाठी असणाऱ्या यंत्रणे करून सोयीस्कर रित्या चालढकल धोरण अवलंबले गेल्याने किंवा अयोग्य दर्जाच्या रस्त्याची दुरुस्ती दोष दायित्व कालावधीत केली जातील असे कारण पुढे घेऊन जाऊन रस्त्या चा अपेक्षित दर्जा राखला जात नाही हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्वी झालेल्या कामादरम्यानच्या अनुभवातून दिसून आले आहे. यामुळे पालघर – त्र्यंबकेश्वर महामार्गाच्या पुनरुभारणी कामाचा दर्जा राखणे प्रशासनासमोर आव्हानात्मक ठरणार आहे.
