पालघर : पालघर-त्र्यंबकेश्वर-घोटी-सिन्नर या १६०अ राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण व डांबरीकरणाच्या कामाच्या दृष्टीने ४७ गावांमधून भूसंपादन केले जाणार असून हे काम पुढील काही महिन्यात पूर्ण करण्याच्या उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर या पालघर ते मोखाडा दरम्यानच्या १०७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येणार आहे.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने १६० अ या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच नूतनीकरणाचे काम मंजूर झाले असून या कामासाठी ११८७.२१ कोटी रुपयांची निविदा सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामामध्ये मोखाडा, जव्हार, मनोर या ८५ किलोमीटरच्या पट्ट्यात अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून मनोर ते पालघर या १९.७३ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या कामादरम्यान पालघर येथील रेल्वे उड्डाणपूल, मासवण व देहेर्जा येथे नदीवरील मोठे पूल, २५ लहान पूल, २१० बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या तसेच ८६ पाईप अंथरूण मोऱ्या उभारण्यात येणार आहेत. या कामांमध्ये मनोर गावाला बायपास करण्यासाठी सुमारे दीड किलोमीटरच्या बाह्यवळण मार्गाच्या उभारणीचा समावेश आहे.
या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील ४७ गावांचा समावेश असून यापैकी ४२ गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामधील सुमारे ४० गावांची मोजणी पूर्ण झाली असून ३० गावांचा अहवाल प्राप्त झाला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने दोन टप्प्यांमध्ये ६३ हेक्टर जमिनीच्या संपादनासंदर्भात प्राथमिक अधिसूचना (३ अ) प्रसिद्ध करण्यात आली असून त्यापैकी १६.७० हेक्टर क्षेत्राची निश्चिती भूसंपादन मोबदला (अवॉर्ड) जाहीर होण्यापूर्वीची अधिसूचना (३ ड) प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच बरोबरीने वनविभागाच्या ताब्यात असल्याच्या जागेच्या ३९.५४ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात सुमारे ६४ हेक्टर क्षेत्र अधिग्रहणाच्या अनुषंगाने प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.
या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात आले असले तरीही अस्तित्वात असणारा महामार्गाचा भाग पूर्णपणे उखडून (खोदकाम करून) नव्याने रस्ता उभारण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासोबतीने लहान मोठ्या पुलांचे रुंदीकरण व नव्याने उभारणी आवश्यकतेनुसार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पालघर त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया पावसाळा संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध निविदेमध्ये दोन वर्षांचा कालावधी नमूद करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात हे काम कुंभमेळ्याच्या पूर्वी करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांनी लोकसत्ता ला दिली.
कशी राहील महामार्गाची रुंदी?
मोखाडा ते मनोर यादरम्यान सद्यस्थिती साडेतीन मीटरचे वाहन मार्ग अस्तित्वात असून या सात मीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी दीड मीटर पेवर शोल्डर अर्थात काँक्रीट साईडपट्टी उभारण्यात येणार आहे. सध्या सात मीटर रुंदीचे वाहन मार्ग असणाऱ्या मनोर पालघर दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून प्रत्येक मार्गीका सात मीटर रुंदीची करून त्याच्या दुतर्फा प्रत्येकी दीड मीटरचे पेव्हर शोल्डर उभारण्यात येणार आहे. या चौपदरी रस्त्याचा मध्यभागी दीड मीटर रुंदीचे दुभाजक उभारण्यात येणार असून प्रत्यक्षात रस्ता हा १८.५० मीटर रुंदीचा उभारण्यात येणार आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची गटार व्यवस्था व इतर बाबी लक्षात घेऊन मोखाडा ते मनोर दरम्यान १८ मीटरचे तर मनोर ते पालघर दरम्यान २४ मीटर रुंदीच्या अनुषंगाने भूसंपादन होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पीसीयु मार्फत गाड्यांच्या वाहतुकीची गणना
एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या एका प्रमाणात निश्चित करण्यासाठी पॅसेंजर कार युनिट अर्थात पीसीयु पद्धतीने केली जाते. यामध्ये बैलगाड्या, अवजड वाहने, परिवहन मंडळाची वाहने, व इतर वाहनांना एका प्रमाणात गणना केली जाते. एका चार चाकी वाहनाला एक युनिट अशी गणना केली जात असताना मोटरसायकलला ०.५ पीसीयु, ऑटो रिक्षा १.२ पीसीयु, हलक्या व्यवसायिक वाहन १.४ पीसीयू, ट्रक, बस २.२ ते ३ पीसीयु, बैलगाडी ६ ते ८ पीसीयू अशी गणना केली जाते.
सद्यस्थितीत असलेली वाहतूक
मोखाडा ते जव्हार दरम्यान सद्यस्थितीत ६०३७ पीसीयु (पॅसेंजर कार युनिट) इतकी वाहतूक असून जव्हार ते मनोर दरम्यान ५४२३ पीसीयु तर मनोर ते पालघर दरम्यान दररोज १६ हजार ८७१ पीसीयु वाहतूक असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
