बोईसर: पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि इतर विविध प्रकल्पांविरोधात स्थानिक नागरिकांचा विरोध अधिकच प्रखर झाला आहे. जिल्ह्यातील भूमिपुत्र, शेतकरी, बागायतदार, आदिवासी आणि मच्छीमारांनी स्थानिकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आज वाढवण बंदराजवळील वरोर येथे भव्य ‘जनआक्रोश सभा’ पार पडली. या सभेत आठ ते दहा हजार नागरिकांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील सर्व प्रस्तावित प्रकल्प हद्दपार करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
​
​केंद्र व राज्य सरकारमार्फत पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर, केमिकल झोन, पेट्रोकेमिकल प्रकल्प, कोरे ऑफशोअर आंतरराष्ट्रीय विमानतळ, टेक्सटाइल पार्क, ग्रीनफिल्ड महामार्ग इत्यादी महाकाय प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांचे विस्थापन होणार असून, पारंपारिक मासेमारी आणि शेती-बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​वाढवण येथे उभारले जाणारे बंदर, केमिकल झोन आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहेत. तसेच कोरे ऑफशोअर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ‘चौथी मुंबई’ या संकल्पनेच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी भांडवलदार उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप सभेत सहभागी वक्त्यांनी केला. आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क अबाधित राहावेत आणि पारंपारिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे रक्षण व्हावे, यासाठी कोणत्याही परिस्थितीत विस्थापन सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला.

​विरोधी पक्ष आणि ५२ संघटनांचा भक्कम पाठिंबा :

​वरोर येथील चिंचणी-डहाणू रस्त्याशेजारील प्रांगणात पार पडलेल्या जन आक्रोश सभेला संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरू झालेली सभा दुपारी ४ वाजेनंतर देखील सुरू होती. सभेला किनारपट्टीवरील कोरे, उसरणी, एडवण, भादवे, सातपाटी, मुरबे, वाढवण, पालघर आणि डहाणू तालुक्यातील महिला, तरुण, शेतकरी, आदिवासी व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जन आक्रोस सभेला राजकीय व सामाजिक पटलावरून मोठा पाठिंबा मिळाला. ‘वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती’ आणि ‘पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सभेला जिल्ह्यातील तब्बल ५२ संघटनांनी पाठिंबा दिला. राजकीय पटलावरून काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि बहुजन विकास आघाडी हे प्रमुख पक्ष व भूमी सेना आदिवासी एकता परिषद, कुणबी सेना, कष्टकरी संघटना व इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​प्रमुख नेत्यांची उपस्थिती व सरकारवर जोरदार हल्लाबोल :

वरोर येथील जन आक्रोश सभेत सहभागी झालेल्या विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. स्थानिकांच्या आणि पर्यावरणाच्या बलिदानावर उभारले जाणारे कोणतेही विकास प्रकल्प पालघरची जनता स्वीकारणार नाही, असे सांगत हे प्रकल्प तात्काळ रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आता सभा, मोर्चे आणि आंदोलनांची वेळ निघून गेली आहे. हे प्रकल्प कायमचे हद्दपार करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कृती करण्याची वेळ आली आहे. असे प्राध्यापक दीपक पवार आणि ठणकावून सांगितले. तर अंबादास दानवे यांनी “सरकार स्वतःचे धंदे चालवण्यासाठी हे प्रकल्प राबवत आहे. शेतकऱ्यांना ५ हजार रुपये दिले जातात आणि प्रकल्पांवर हजारो कोटी उधळले जातात. या संघर्षात आम्ही स्थानिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्धार व्यक्त केला. “येणाऱ्या निवडणुकीत पालघर जिल्हा भाजपमुक्त करू. प्रकल्प रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. उद्यापासून महामार्गाचे काम बंद झाले पाहिजे, अन्यथा वाहने फोडली जातील असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला तर “ही लढाई फक्त वाढवणची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आपण वाढवणची लढाई जिंकली, तर महाराष्ट्रातील इतर सर्व आंदोलने जिंकू. आपला शत्रू एकच असून, आंदोलनात फूट पडू न देता ही लढाई निकराने लढली पाहिजे या या शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वडवण बंदर विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला.

​या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, आमदार विनोद निकोले, विलास पोतनीस, केदार दिघे, माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार राजू पाटील यांच्यासह स्थानिक मच्छीमार व आदिवासी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

​पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि वाहतूक बदल:

​सभेत नागरिकांचा आक्रमक पवित्रा पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालघर पोलिसांनी सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सभेमुळे चिंचणी – वरोर – डहाणू रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बोईसर व डहाणूकडून येणारी अवजड वाहने वाणगाव मार्गे पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात आली होती.

​