पालघर : पालघर शहराच्या वेशीवर नवली येथील एका महिलेला बिबट्याने हल्ला करून मारल्याच्या घटनेला महिना उलटण्यापूर्वीच वाणगाव परिसरातील मतेगाव (चंडीगाव) परिसरात आज सायंकाळी सहा – साडे सहा वाजल्याच्या सुमारास कामावरून परतणाऱ्या महिला शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तुळशी सावर (६५) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर बिबट्याचा राज रोज वावर होत असल्याचे दिसून आल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
९ ऑक्टोबर रोजी आज घडलेल्या हल्ल्याच्या घटनेपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पालघर भोगले पाडा येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी बिबट्याचा वावर राजरोसपणे होताना दिसून येत होता. बिबट्या कडून कुत्रे, गाईचे बछडे व इतर वन्य प्राणी मारल्याच्या घटना घडत असताना आज सायंकाळी डहाणू वनविभागांतर्गत येणाऱ्या बोईसर परिक्षेत्रातील मतेगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध शेतमजूर महिला जागीच ठार झाली.
तुळशी रामा सावर (मूळ रा. सरशी, ता. विक्रमगड) असे मृत महिलेचे नाव आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून संतप्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या निष्क्रीयतेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
वनविभागाच्या भूमिकेकडे लक्ष
घटनेची माहिती मिळताच बोईसर परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. वनविभाग आता यावर काय तातडीची कारवाई करतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नेमकी घटना काय?
मतेगाव येथील गट क्रमांक १८३/५ मध्ये चंडीगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी बळवंत ठाकाजी राऊत यांची खाजगी कृषी वाडी आहे. या वाडीमध्ये नेहमीप्रमाणे मजुरीचे काम आटोपून तुळशी सावर या संध्याकाळी सुमारे साडेसहा ते सातच्या सुमारास बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झेप घेतली. श्वापदाने थेट मानेवर पकड घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेतकरी बळवंत राऊत व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बिबट्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. प्राथमिक माहितीनुसार हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
शेती व्यवसाय आणि अर्थचक्राला मोठा फटका
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रब्बी आणि बागायती पिकांचा हंगाम ऐन भरात असताना शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे, औषध फवारणी करणे व राखण करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. मजुरांनी शेतात कामावर येण्यास स्पष्ट नकार दिल्याने परिसरातील शेतीव्यवस्था आणि त्यावर अवलंबून असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“मानवी रक्ताला चटावलेल्या या श्वापदामुळे शेतकरी आणि मजुरांचा जीव टांगणीला लागला आहे. वनविभागाने तात्काळ या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वपक्षीय स्थानिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढला जाईल.” – मिलिंद पाटील शेतकरी प्रतिनिधी
