मुंबई : पालघर जिल्ह्यासह वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने विशेष मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही वाढीव मदत मंजूर करण्यात आली आहे.

राज्य सरकारने पूरग्रस्त कुटुंबांना कपडे व घरगुती वस्तूंच्या नुकसानीसाठी प्रत्येकी १० हजार रुपये, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी १.५० लाख रुपये, तर अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी नुकसानीच्या प्रमाणानुसार १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपडीसाठी १५ हजार रुपये मदत मिळणार आहे.

पूरात मृत झालेल्या पशुधनासाठीही वाढीव आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रती दुभत्या जनावरासाठी ४० हजार रुपये, ओढकामाच्या प्रती जनावरासाठी ३२ हजार रुपये, लहान ओढकामाच्या प्रती जनावरासाठी २० हजार रुपये, तर मेंढी, बकरी किंवा डुकरासाठी ४ हजार रुपये मदत दिली जाईल. कुक्कुटपालनातील पक्ष्यांसाठी प्रति पक्षी १०० रुपये मदत दिली जाईल, ही मदत कमाल १० हजार रुपये प्रति कुटुंब देण्यात येणार आहेत.

नोंदणीकृत व परवानाधारक दुकानदारांना पंचनाम्यानुसार झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना ७५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपये मदत देण्यात येईल. कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.

पंचनाम्यानंतर पात्र लाभार्थी निश्चित करून मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रणालीवरही माहिती अपलोड करण्यात येणार आहे.

मच्छीमारांनाही या निर्णयाचा लाभ

मच्छीमारांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असून, बोटीचे अंशतः नुकसान झाल्यास १० हजार रुपये, पूर्ण नुकसान झाल्यास २५ हजार रुपये, जाळ्यांच्या नुकसानीसाठी ५ ते ६ हजार रुपये मदत दिली जाईल. तसेच हस्तकला व हातमाग कारागीरांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.