पालघर : पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पुढाकाराने जून महिन्यात आरंभलेले विकलंंगता मुक्त पालघर या अभियाना च्या पहिल्या टप्प्याला यश लाभले असून या योजनेअंतर्गत अस्थिवंग असणाऱ्या १८ बालकांवर शस्त्रक्रिया व आवश्यक उपचार झाले असून ही बालके आता स्वतः चालू लागली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या बालकांच्या संगोपण संदर्भातील पालकांसमोरील समस्या निवळल्या आहेत.

विष्णू सवरा सामाजिक न्यास, जुपिटर रुग्णालय, इन्स्टिट्यूट ऑफ पेडियात्रिक ऑर्थोपेडिक डिसऑर्डर (मुंबई) तसेच मुंबई येथील मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अस्थिरोग तज्ञ डॉ. तरल नागदा, डॉ. जगदीप घमेले यांच्या पुढाकाराने विकलंगता मुक्त पालघर या मोहिमेचा शुभारंभ ६ जून रोजी करण्यात आला होता. पालघरच्या जिल्हा रुग्णालयात आयोजित या शिबिरात जन्मतः अथवा बालवयात वेगवेगळ्या १८२ बालकांवर ओढवलेल्या विकलांग परिस्थिती संदर्भात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती.

या शिबिरात सहभागी झालेल्या बालकांपैकी ६२ बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी २७ बालकांना लघु शास्त्रक्रिया (मायनर सर्जरी) करणे अपेक्षित असून या अंतर्गत असणाऱ्या १८ बालकांची उपचार जवळपास पूर्ण झाले आहेत. लघु शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या उर्वरित बालक तसेच मेजर व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असणाऱ्या अस्थिवंग बालकांवर आगामी काही महिन्यात शस्त्रक्रिया व पुढील उपचार करण्याचे नियोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

शस्त्रक्रिया झालेल्या बालकांच्या नित्यक्रम (रुटीन) तपासणी एकाच ठिकाणी करणे सुलभ व्हावे या दृष्टीने या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पालघरच्या ग्रामीण रुग्णालय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचार झालेली सर्व बालके उपस्थित होती व त्यापैकी अधिक तर बालके व्यवस्थितपणे चालू शकत असल्याचे शिबिराच्या तपासणी दरम्यान दिसून आले. याच बरोबरीने विकलांगता मुक्त पालघर अंतर्गत दरवर्षी आयोजित होणाऱ्या वार्षिक शिबिराच्या बरोबरीने अशा प्रकारचे आजार अथवा विकार असणाऱ्या बालकांना तपासणीची संधी मिळावी म्हणून या दर महिन्याला आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती लाभणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आजच्या या शिबिराला १० नवीन रुग्ण तपासणीसाठी आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

खासदार अस्थिरोग तज्ञाच्या भूमिकेत

शस्त्रक्रिया करून आलेल्या बालकांची पाहणी व तपासणी करण्यासाठी अस्थिरोग तज्ञ असणारे पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी स्वतः जातीने लक्ष दिले. बालकांच्या शस्त्रक्रिया झाल्याच्या ठिकाणी तपासणी करत त्यांनी कोणत्या प्रकारचे नियमित व्यायाम करायला हवेत व काळजी घ्यायला हवी या संदर्भात त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आवश्यक असणाऱ्या बालकांना अस्थिरोग विषयक आधार उपकरणांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.