बोईसर: पालघर जिल्ह्यातील विराज प्रोफाइल उद्योगाच्या विस्तारा विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. स्थानिक संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढून  पर्यावरणीय मंजुरीसाठीची जन सुनावणी रद्द करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती, मात्र प्रशासनामार्फत या मागणीची दखल घेण्यात न आल्याने संघर्ष समितीतर्फे पुढील काळात रस्त्यावरच्या लढाई सोबतच कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील मान वारंगडे ग्रामपंचायत हद्दीत विराज प्रोफाइल एसआरएम या स्टील उद्योगाने १०५ एकर जमिनीवर विस्तार करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी आठ एप्रिल रोजी विराज कारखान्याच्या आवारात जाहीर जन सुनावणी घेण्यात येणार आहे.

मात्र स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू झाला आहे. विराज प्रोफाइल प्रकल्पातून होणाऱ्या वायू आणि जलप्रदूषणामुळे मान वारंगडे, गुंदले, कल्लाळे, कांबळगाव, बेटेगाव, खैरे पाडा, कुकडे महागाव या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलस्त्रोत, शेत जमीन आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करत स्थानिक संघर्ष समितीने जन सुनावणी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. विराज प्रोफाइल उद्योगाला असणारा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी शनिवारी मान येथील कारखान्यावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. मात्र बुधवारी होणारी जन सुनावणी रद्द करण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात न आल्याने स्थानिक नागरिक आणि संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.

जन सुनावणीचे ठिकाण हे नैसर्गिक न्यायाला धरून नसून  प्रशासनाकडून जन सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. विराज प्रोफाइल प्रकल्प विरोधात रस्त्यावरच्या लढाईसोबतच न्यायालयीन लढाई देखील लढण्याचा निर्धार संघर्ष समितीने जाहीर केला असून जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बुधवारी होणारी जन सुनावणी कोणताही अडथळा न येता पूर्ण करण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

जनसुनावणी स्थगित करण्याची आमदार विलास तरे यांची मागणी :

विराज कंपनीच्या  विस्तारीकरण प्रकल्पावरून  मोठा वाद उफाळून आला असून, स्थानिक ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार विलास तरे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. संशयास्पद पद्धतीने राबविण्यात येत असलेली जनसुनावणी प्रक्रिया, पर्यावरणीय धोके आणि स्थानिकांवरील अन्याय याविरोधात त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. इंदूराणी जोखड यांना सविस्तर निवेदन देत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. . आमदार तरे यांनी प्रशासनाकडे चार ठोस मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये जनसुनावणी तात्काळ स्थगित करणे, पर्यावरणीय अहवाल (EIA) सार्वजनिक करणे, ग्रामस्थांची संमती घेणे आणि नियमभंग झाल्यास कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विराज प्रोफाइल व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण :

विराज प्रकल्पाचे प्रस्तावित विस्तारीकरण आणि पर्यावरणीय मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली जन सुनावणी याबाबत स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीमार्फत अनेक आक्षेप घेण्यात आले असून त्या अनुषंगाने विराज प्रोफाइल व्यवस्थापन यांनी देखील आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली

आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि मान वारंगडे येथे कार्यरत असलेला विराज प्रोफाइल्स उद्योग स्वच्छ, शाश्वत आणि सातत्याने सुधारत जाणाऱ्या पर्यावरणीय कामगिरीसाठी आपल्या व्यावसायिक तत्त्वज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कटिबद्ध असून शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकास आणि समाज विकास या क्षेत्रांतील उपक्रमांद्वारे विराज प्रोफाइल्स प्रा. लि. आपल्या आसपासच्या भागांसोबत आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय उन्नतीसाठी कार्यरत असल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. विराज उद्योगांमध्ये सध्या १३ हजार कामगार कार्यरत असून प्रस्तावित प्रकल्प ५,००० पेक्षा अधिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असे आश्वासन विराज व्यवस्थापनाने दिले आहे. प्रकल्पामुळे बाधित गावातील नागरिकांसाठी आरोग्य व स्वच्छता, महिला सक्षमीकरण,शिक्षण,पायाभूत सुविधा विकास,

कौशल्य विकास केंद्रे,गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

पर्यावरण व शाश्वतता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून  सौर व पवन ऊर्जेचा वापर, आधुनिक वायू व जलशुद्धीकरण प्रणाली, हरित पट्टा विकास आणि जनजागृती यावर भर असणार असल्याचा दावा विराज प्रोफाइल चे सुनील कस्तुरे  यांनी केला.