पालघर जिल्ह्यातील विराज प्रोफाइल उद्योगाच्या नियोजित विस्तारीकरण प्रकल्पाला परिसरातील नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. प्रकल्पाचे नियमितीकरण आणि विस्तारीकरणासाठी पर्यावरणीय मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी ही बेकायदेशीर असून ती रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

विराज प्रोफाइल उद्योगाविरोधात लढा अधिक तीव्र करण्यासाठी स्थानिक संघर्ष समितीतर्फे शनिवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.विराज प्रोफाइल एसआरएम उद्योगाच्या नियोजित नियमितीकरण विस्तारीकरण प्रकल्पाला मान वारंगडे आणि गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. पर्यावरणीय मंजुरी जन सुनावणी संदर्भात मान ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी विस्तारीकरण प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याचा ठराव बहुमताने मंजूर केला.

मान ग्रामपंचायत ही आदिवासीबहुल पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे प्रकल्पाचे विस्तारीकरण आणि जन सुनावणीसाठी आवश्यक ग्रामसभेची परवानगी न घेता, प्रकल्पाचा परिसरावर पर्यावरणीय आघात याबाबत अभ्यास किंवा हरकती नोंदवण्याकरता नागरिकांना पुरेसा अवधी न देता तसेच कोणत्याही प्रकारे सल्लामसलत न करता प्रकल्प आणि जन सुनावणी जबरदस्तीने आणि घाईघाईत रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघर्ष समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करून विस्तारीकरण प्रकल्प आणि जन सुनावणी रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, मनसेचे जिल्हाप्रमुख समीर मोरे, भावेश चुरी, कुणबी सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, प्रशांत पाटील, सचिन लोखंडे, अशोक शिंगाडा, डेरेल डिमेलो, नीता काटकर, सरपंच अंजली भावर, राहुल पाटील, हेमंत पाटील आधी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ असलेल्या मान ग्रामपंचायत हद्दीत विराज प्रोफाइल एसआरएम उद्योगाचे ४१ हेक्टर जमिनीवर नियमितीकरण आणि विस्तारितकरण करण्यात येणार आहे.

उद्योगातर्फे सध्याच्या कार्यरत प्रकल्पाच्या लगत असलेल्या जमिनीवर विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आहे. विस्तारीकरणामुळे विराज प्रोफाइल उद्योगाची उत्पादन क्षमता वार्षिक एक लाख ९५ हजार ८४० प्रती टनावरून दोन लाख ७६ हजार टन पर्यंत वाढवण्याचा व एचआरएपी/सीआरएपी शीट्स, प्लेट्स व कॉइल्सचे उत्पादन वार्षिक २० लाख टन करण्याचा प्रस्ताव आहे.

पर्यावरण आघात मूल्यांकन अधिनियम २००६ (सुधारित अधिसूचना १ डिसेंबर २००९) नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर कार्यालय-२ च्या वतीने आठ एप्रिल रोजी मान येथील विराज प्रोफाइल उद्योगाच्या प्रांगणात पालघरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जन सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

विराज प्रोफाइल उद्योगाविरोधातील स्थानिक नागरिकांचे आक्षेप :

बोईसर चिल्हार रस्त्यावरील मान-वारंगडे ग्रामपंचायत हद्दीत विराज प्रोफाइल एसआरएम उद्योगाचा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदूषण होत असून परिसरातील नैसर्गिक नाले, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, शेत जमीन दूषित होऊन मानवी आरोग्य, जलचर आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उद्योगाच्या विस्तारीकरणा नंतर या समस्यांमध्ये अधिकच वाढ होणार असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. उद्योगाची उभारणी करताना बाधित गावांच्या विकासासाठी सामाजिक दायित्व योजने अंतर्गत १० कोटी रूपये निधी आणि जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा कंपनीचा दावा फोल ठरला असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. विराज प्रोफाइल उद्योगाच्या विस्तारीकरण प्रकल्पाला विरोध आणि जन सुनावणी रद्द करण्यासाठी संघर्ष समिती तर्फे मान ग्रामपंचायत कार्यालय ते विराज प्रोफाइल प्रकल्पापर्यंत शनिवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

विराज प्रोफाइल व्यवस्थापनाची भूमिका :

मौजे मान ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत विराज प्रोफाइल एसआरएम उद्योगाच्या विस्तारीकरण प्रकल्प मान्यतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे ८ एप्रिल रोजी आयोजित जन सुनावणी संदर्भात कंपनी व्यवस्थापनाकडून शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक यांचा असलेला आक्षेप व मुद्द्यांबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येणार आहे असे विराज प्रोफाइल एसआरएम व्यवस्थापनाने लोकसत्ता ला कळविले आहे.