पालघर : मतदार यादीचे विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीपासून राबविण्यात येत असली तरी यादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती, केंद्रस्तरीय मतदार अधिकारी यांना शालेय कामकाज सांभाळून करावयाचे फेरतपासणीचे काम तसेच मतदारांकडून मिळणारा थंड प्रतिसाद यामुळे अवघ्या ३५ टक्के मतदारांना प्रपत्र प्रगणक (Enumeration Form – EF) गणना अर्जांचे वितरण झाले आहे. हे अर्ज भरून त्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी देखील अडचणी येत असून सात टक्के गणना प्रपत्र अर्ज डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यात आले. नालासोपारा, बोईसर व वसई विधानसभा क्षेत्रात या फेर तपासणी प्रक्रियेला लाभलेला प्रतिसाद तुलनात्मक खूपच कमी असल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंतेचे ढग वावरत आहेत.
जून महिन्याच्या अखेरीपासून महिन्याभराच्या कालावधीत प्रत्येक मतदाराला गणना प्रपत्र द्यावयाचे असून या अर्जांमध्ये ४० वर्षापेक्षा अधिक वयाच्या मतदारांनी सन २००२ चा मतदार यादी मधील तपशील तर ४० वर्षाखालील मतदारांनी त्यांच्या आई- वडिलांपैकी एकचा सन २००२ च्या मतदार यादीतील तपशील भरणे व सोबत स्वतःचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आई- वडिलांचे नाव व इतर तपशील भरावयाचा आहे. हा तपशील गणना प्रपत्रामध्ये भरण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा अवधी लागत असून मतदारांच्या सहकार्यावर या कामाचा निपटारा अवलंबून राहत आहे.
या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेपूर्वी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी विद्यमान मतदार यादी व सन २००२ च्या मतदार याद्यांचे मॅपिंग केले होते. जिल्ह्यात एकूण ६६.४२ टक्के मतदारांचे प्रत्यक्षात मॅपिंग झाले असले तरी २१.४० टक्के नावांमध्ये चुका, विसंगती व इतर काही तांत्रिक दोष आढळले होते. मॅपिंग मध्ये वसई, बोईसर व नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मॅपिंग ५७ टक्क्यांपेक्षा कमी राहिली होते.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती यामुळे या फेर तपासणी प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. अनेक बीएलओ हे शालेय शिक्षक असल्याने शाळा संपवून सायंकाळी उशिरा काम करणे त्यांना त्रासदायक ठरत आहेत. शिवाय अनेक मतदारांची परिपूर्ण पत्ते व संपर्क तपशील उपलब्ध नसल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत. तसेच अनेक मतदारांनी अधिवासाचे ठिकाण बदलल्याने अथवा विधानसभा मतदारसंघ सोडून इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांच्यापर्यंत गणना अर्ज पोहोचवणे त्रासदायक व अडचणीचे ठरत आहे.
सद्यस्थितीत डहाणू विधानसभा क्षेत्रातील ५३.९० मतदारांपर्यंत प्रगणक अर्ज पोहोचवण्यात आले असून विक्रमगड मतदार संघात ९५.९३ टक्के, पालघर विधानसभा क्षेत्रात ७२.९५ टक्के, बोईसर विधानसभा क्षेत्रात १४.७५ टक्के, नालासोपारा विधानसभा क्षेत्र ५.८९ टक्के तर वसई विधानसभा क्षेत्रात १२.९४ टक्के असे एकूण ३५.१६ टक्के प्रगणक अर्जांचे वितरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
हे प्रगणक अर्ज भरून त्याला डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यासाठी नागरिकांकडून अर्ज भरून देण्यात मिळणारा थंड प्रतिसाद, बीएलओ यांना नैमित्तिक काम संपवून एसआयआर कामासाठी होणाऱ्या वेळेची उपलब्धता तसेच भरलेले फॉर्म अपलोड करताना संकेतस्थळावरील अडचणी व इंटरनेट सेवेची उपलब्धता याचे अडथळे ठरत आहे. डहाणू विधानसभा क्षेत्रात २१.९४ टक्के, पालघर विधानसभा क्षेत्र १३.२० टक्के अर्ज डिजिटल स्वरूपात अपलोड झाले असून उर्वरित चार विधानसभा क्षेत्रातील १० टक्क्यांपेक्षा कमी मतदारांचे अर्ज डिजिटल स्वरूपात अपलोड झाले आहेत. नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मतदारांपैकी दोन टक्क्यांपेक्षा कमी मतदारांचा तपशील डिजिटल स्वरूपात अपलोड झाला असून नालासोपारा बोईसर व वसई येथील मतदार संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत आतापर्यंत एसआयआर कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. तसेच मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकसहभागातून राबविण्यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.
यावेळी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथ लेव्हल एजंट (BLA) यांची नियुक्ती तातडीने करून त्याची माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. बूथ लेव्हल अधिकारी (BLO) हे घरपोच (House-to-House) भेटी देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form – EF) वितरित करीत असून या कामात बूथ लेव्हल एजंट यांनी बीएलओ यांना आवश्यक ते सहकार्य करून पात्र मतदारांपर्यंत प्रपत्र पोहोचविण्यास मदत करावी तसेच मतदारांना प्रपत्र वेळेत भरून सादर करण्याबाबत जागरूक करावे, अशी विनंतीही बैठकीत करण्यात आली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासन व राजकीय पक्ष यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बीएलए ची संख्या मर्यादित
मतदार यादीची विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेत विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट अर्थात बीएलए ची संख्या मर्यादित असल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २२७४ मतदार भाग याद्या असून भाजपाचे २२०१, शिवसेनेचे १३२४, शिवसेना ठाकरे पक्षाचे १०६४, काँग्रेस पक्षाचे ३५४, सीपीएम पक्षाचे २४८ तर बीएसपी पक्षाचे ६० असे एकूण ५२५२ बीएलए सध्या कार्यरत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.
