पालघर : पालघर जिल्ह्यातील २३.७६ लाख मतदारांपैकी १७.०६ लाख मतदारांची यशस्वी फेरतपासणी प्रक्रिया पूर्ण झाली असून ६.७० लाख मतदारांचे भवितव्य अंधारात आहे. डिजिटलाईज झालेल्या प्रगणक प्रपत्रांमधील १.९३ लाख अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या असून अशा अर्जांची तसेच मॅपिंग न होऊ शकणारे अर्जांवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय होणार आहे. मात्र डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापेक्षा प्रगणक प्रपत्रांच्या डिजिटल अपलोडिंगचे प्रमाण १.७९ लाखानी अधिक असून मतदार संख्येमध्ये असणारी नैसर्गिक वाढ व प्रत्यक्षात यापूर्वी झालेल्या मतदानामध्ये समतोल असल्याचे दिसून आले.

मतदार यादीची विशेष फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात २३ लाख ७६ हजार ५३ मतदार नोंदवण्यात आले होते. या सर्व मतदारांपर्यंत प्रगणक प्रपत्र पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले होते. या विशेष फेरतपासणी अभियानात ७२,१६६ मतदार (३.०७ टक्के) मृत असल्याचे, चार लाख १६ हजार ७९७ मतदारांशी (१७.५४ टक्के) संपर्क होऊ शकला नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे एक लाख २३ हजार ५०७ (५.२० टक्के) मतदार जिल्हा बाहेर स्थलांतरित झाले असल्याचे तर ३४,१९० (१.४४ टक्के) अन्य ठिकाणी नोंदणीकृत झाल्याचे दिसून आले आहे. या खेरीज २२,३४८ मतदारांची अन्य कारणांमुळे प्रपत्र अस्विकृत राहिली आहेत. प्राप्त व स्वीकृत झालेल्या प्रगणक प्रपत्रांपैकी एक लाख ९३ हजार प्रगणक प्रपत्रांमध्ये त्रुटी असल्याने या अर्जांना पुढील काही दिवसात सुनावणी दरम्यान आपली त्रुटी दूर करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

स्वीकारण्यात न आलेल्या प्रगणक पत्रांमध्ये नालासोपारा विधानसभेमधील ४६.४३ टक्के, बोईसर विधानसभा क्षेत्रातील ३४.४१ टक्के तर वसई विधानसभा क्षेत्रातील २९.८० टक्के असे एकूण २८.१९ टक्के मतदारांचा समावेश आहे. तर विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील विद्यमान मतदार यादीतील ९१.५६ टक्के मतदारांची यशस्वी फेरतपासणी झाली असून डहाणू विधानसभा क्षेत्रातील ९०.१७ टक्के, पालघर विधानसभा क्षेत्रातील ८३.५९ टक्के मतदारांसह एकूण ७१.८१ टक्के मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६.७० पेक्षा अधिक मतदारांचे भवितव्य टांगणीला पडले आहे.

विधानसभेच्या तुलनेत मतदार संख्या वाढली

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात झालेल्या मतदानाच्या तुलनेत स्वीकृत झालेल्या प्रगणक प्रपत्राची संख्या एक लाख ७९ हजार २२४अधिक असून सर्वाधिक अस्वीकृत झालेल्या नालासोपारा विधानसभा क्षेत्र विधानसभा निवडणुकीपेक्षा ५५७० मतदार अधिक नोंदले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत डहाणूमध्ये ५५,५८३ मतदार, विक्रमगड मध्ये ४१,४१७ मतदार, पालघर विधानसभा क्षेत्रा ३५,७५२ मतदार वसई विधानसभा क्षेत्रात ३१,०८१ तर बोईसर विधानसभा क्षेत्रात ९,८२१ मतदार संख्येत वाढ झाल्याने प्रत्यक्ष मतदान करणारे व फेरपडताळणी (पुनरीक्षण) झालेल्या मतदारांच्या संख्येमध्ये समतोल असल्याचे दिसून आले आहे.

४१.१६ मतदारांशी संपर्क नाही

जिल्ह्यातील चार लाख १६ हजार ७९७ मतदारांची संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा संपर्क होऊ शकला नसून त्यामध्ये नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील २,५७, ३१४ (३८.८७ टक्के), बोईसर विधानसभा क्षेत्रातील ९३,५३४ (२१.३४ टक्के), वसई मधील ५३,०६० (१४.९५ टक्के) मतदारांचा तर पालघर मधील २.८८ टक्के, डहाणू मधील १.१६ टक्के व विक्रमगडमधील ०.२४ टक्के मतदारांचा समावेश आहे.

स्थलांतरित दुबार मतदारांची संख्या लक्षणीय

वसई विधानसभा क्षेत्रातील ९.२७ टक्के मतदान अन्य ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित झाले असून नालासोपारा पालघर व बोईसर विधानसभा क्षेत्रातील सुमारे पाच टक्के तर विक्रमगड व डहाणू विधानसभा क्षेत्रातील सुमारे तीन टक्के मतदान अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच बरोबरीने पालघर विधानसभा क्षेत्रातील ८,५९९, बोईसर विधानसभा क्षेत्रातील ७,१०५, डहाणू विधानसभा क्षेत्रातील ६,१४१, वसई मतदार संघातील ४,५१२, नालासोपारा मतदारसंघातील ४,३५३ तर विक्रमगडमधील ३,४८० मतदार दुबार असल्याचे किंवा अन्य ठिकाणी नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.