पालघर : १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नोंदणी करण्यासंदर्भात २६ व २७ सप्टेंबर रोजी संबंधित मतदार केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नमुना क्र. ६ (Form-६) द्वारे नोंदणी करून घेण्यात येईल. शिबिरांमध्ये नागरिकांना मतदार यादीतील नावाची पडताळणी करणे, आवश्यक असल्यास तपशिलातील दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी अर्ज करणे आणि संबंधित आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन केले जाईल.
स्थलांतर, तपशिलातील बदल अथवा छायाचित्र ओळखपत्रात (EPIC) दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ (Form-८) भरण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. पात्र नागरिकांना नोंदणी सुलभ व्हावी याकरिता येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील संबंधित मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती तसेच नवमतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरातील पात्र व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचवून नोंदणीस प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष शिबिराव्यतिरिक्त नागरिकांना भारत निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर्स सर्व्हिस पोर्टल’वर (Voters’ Service Portal) ऑनलाइन नोंदणी, अर्जाची सद्यस्थिती तपासणे आणि यादीत नाव शोधण्याची सुविधा २४ तास उपलब्ध आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR-२०२६) कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मतदार यादीत अद्याप नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
“लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असून एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विशेष शिबिरांचा संबंधितांनी लाभ घ्यावा” – डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाधिकारी
